Chinchwad : काळभोरनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील जिजाऊ क्लिनिक सुरू करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची आग्रही मागणी

एमपीसी न्यूज – वाढती लाेकसंख्या विचारात घेता नागरिकांना घराजवळ,  जलद आणि मोफत उपचार ( Chinchwad ) पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. काळभोरनगर, मोहननगर, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर,  चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या भागात जिजाऊ क्लिनिक अथवा आराेग्यवर्धिनी केंद्र उभारावेत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी महापालिकेच्या अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, एकीकडे महागाईच्या काळात वैद्यकीय उपचार सर्वसामान्य रूग्णांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. गोरं गरीब रूग्णांना महापालिकेच्या वतीने आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे.

Pimpri : पिंपरीतील मराठा समाजाचे साखळी उपोषण स्थगित

राज्य शासनाच्या सुचनेनुसार आठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 79  आराेग्यवर्धिनी केंद्र अथवा जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय सेवा या दर्जेदार असल्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्य भरातील उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 8 मोठी रुग्णालये, 27 दवाखाने, 20 आरोग्य केंद्र, 8 कुटुंब नियोजन केंद्र, 36 लसीकरण केंद्र आहेत. 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे वायसीएम, 400 खाटांचे थेरगाव रूग्णालय,

100 खाटांचे नवीन भोसरी, 130 खाटांचे नवीन आकुर्डी रूग्णालय, 120 खाटांचे नवीन जिजामाता यासह 1 हजार 589 खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रूग्णालयात आहेत. महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्‍टर, अत्याधुनिक यंत्र सामुग्री, उत्तम दर्जाची सेवा, साफ-सफाई ही उत्तम दर्जाची आहे. यामुळेच शहर परिसर, जिल्ह्यासह राज्यभरातील रूग्ण पालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी येत आहेत.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले ”महापालिकेच्या मोठ्या रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरात 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, 1 किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा 25 ठिकाणी आराेग्यवर्धिनी केंद्र अथवा जिजाऊ क्‍लिनिक सुरू करण्याचे नियाेजन केले आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 आणि 14 मधील काळभोरनगर, मोहननगर, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर,  चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी ( Chinchwad) जिजाऊ क्लिनिक अथवा आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करावे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.