Chinchwad : पुणे-मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथील आउट पास ठरतोय धोकादायक

तीन मार्गावरील वाहतूक अन विरुद्ध दिशेने जाणारी वाहने यामुळे भीषण अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावरून काळभोरनगर (Chinchwad) येथे बाहेर पडणारी वाहतूक, बीआरटी मधून धावणाऱ्या बसेस आणि सेवा रस्त्यावरील वाहने एकाच ठिकाणी येत असून त्यातील काही वाहने आकुर्डी, दळवीनगरकडे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने जातात. त्यामुळे महामार्गावर काळभोर नगर येथील आउट पास धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या काही मीटर अंतरावर काळभोर नगर आउट पास आहे. येथून आकुर्डी, चिंचवडगाव, दळवीनगर, प्राधिकरण या भागात जाणारी वाहने महामार्गावरून बाहेर पडतात. दरम्यान, रेल्वे लाईन लगत जाणाऱ्या रस्त्याने आकुर्डी, प्राधिकरण, रावेत, चिंचवड येथे जाता येत (Chinchwad ) असल्याने काही वाहन चालक काही अंतर विरुद्ध दिशेने जाऊन पुढे जातात. यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक खोळंबते.

MP Shrirang Barne : ‘ईपीएस’ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा, खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

काळभोरनगर आउटपास जवळ होणारी वाहतूक कोंडी नित्याची होऊ लागली आहे. त्यात बीआरटी मार्गातून बसेस वेगाने जात असतात. बीआरटी मार्गाला ओलांडून वाहनांना वळून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वाहने बीआरटी मार्गात थांबलेली असतात. यामुळे बीआरटी बसेसचा देखील खोळंबा होतो.

हा आउट पास चिंचवड रेल्वे स्टेशन चौकाच्या दिशेने सुमारे 150 मीटर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जाते. काळभोरनगर येतून चिंचवडकडे जाणारी वाहने अंडरपास मधून विरुद्ध दिशेने येऊन चिंचवड आणि आकुर्डी प्राधिकरण येथे जातात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.

चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे म्हणाले, “काळभोर नगर येथील महामार्गावरील आउट पास स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्याबाबत संबंधितांकडे पत्रव्यवहार केला जात आहे. आउट पास स्थलांतरित केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल पर्यायाने अपघाताचा आणि वाहतूक कोंडीचा धोका कमी होईल.”

पीएमपीएमएलचे बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे म्हणाले, “काळभोर नगर येथे बीआरटीच्या परिचालनास अडथळा येत असल्यास त्याबाबत कार्यवाही केली जाईल. पोलीस अथवा महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.