Chinchwad : तडीपार केलेल्या तीन गुंडांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

गणेशोत्सवात गुंडा विरोधी पथकाची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने गणेशोत्सवादरम्यान विशेष मोहीम राबवली. वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. हे तीनही गुंड तडीपारीच्या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत येऊन शस्त्र बाळगून होते. गुंडा विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे इतर सराईत गुन्हेगारांची चांगलीच तंतरली आहे.

दीपक आबा दाखले (वय 25, रा. निसर्ग कॉलनी, रहाटणी) याला 7 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तो परवानगीशिवाय शहरात आला असून त्याच्याकडे शस्त्र आहे, अशी माहिती पोलीस अंमलदार रामदास मोहिते यांना मिळाली.

त्यानुसार दाखले याला त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे पोलिसांना एक सत्तूर आढळला आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दीपक दाखले याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

अमित गजानन वानरे (वय 32, रा. आदर्श नगर, किवळे, देहूरोड) याला 12 जुलै 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. तो देखील शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार शुभम कदम यांना माहिती मिळाली असता पोलिसांनी अमित वानरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे.

अमित वानरे याच्या विरोधात सन 2015 पासून देहूरोड, खडकी, चिंचवड, तासगाव, चाकण, निगडी, पिंपरी, रावेत पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्ह्यांची नोंद आहे.

Ganeshotsav 2023 : ससूनमधील रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन; दर्शनावेळी रुग्णांना आनंदाश्रू अनावर

मावळ परिसरातील सराईत गुन्हेगार समीर उर्फ सोन्या जालिंदर बोडके (वय 28, रा. गहुंजे गाव, ता. मावळ) यालाही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तो देखील बेकायदेशीरपणे जिल्ह्याच्या हद्दीत आला.

याबाबत गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत समीर बोडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तूर हे शस्त्र जप्त केले आहे. समीर याच्या विरोधात सन 2014 पासून तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हे शाखेला विविध कारवाया करण्याचे तसेच अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. गुंडा विरोधी पथकाने राबवलेल्या या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगारांची धरपकड झाली असल्याने त्यांच्या पिलावळीला चांगलाच धाक निर्माण झाला आहे. आरोपींना अटक करून संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.