Chinchwad: युवती, महिलांसाठी सोमवारी ‘महिला उद्योजकता विकास’ शिबिर

महिला विकास फाउंडेशनचे संचालिका माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुण्यातील वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहर, परिसर आणि ग्रामीण भागातील युवती आणि महिलांसाठी येत्या सोमवारी (दि. 17)’महिला उद्योजकता विकास’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महिला विकास फाउंडेशनचे संचालिका माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी दिली.

चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथील सभागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता हे शिबिर होणार आहे. पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. जी. डेकाटे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.

  • या उद्योजकता विकास शिबिरामध्ये प्रशिक्षणापासून तर सरकारचे नवीन औद्योगिक धोरण,महिलांविषयी उद्योग धोरण, सरकारच्या विविध योजना, अन्न व औषध विभाग, मुद्रा लोन ,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग आधार नोंदणी, शॉप अॅक्ट परवाना याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी यावेळी मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा. याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योग स्थापनेसाठी आवश्यक लागणा-या महत्वाच्या बाबींची माहिती मार्गदर्शन शिबिरात देण्यात येणार आहे .

मार्गदर्शन शिबिर पिंपरी-चिंचवड शहर, परिसरातील आणि ग्रामीण भागातील युवती व महिलांसाठी विनामूल्य असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे उद्योग स्थापन करणा-या इच्छुक युवती व महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी विनामूल्य करून देण्यात येणार आहे.

  • महिला उद्योजकता विकास शिबिरात जास्तीत-जास्त युवती व महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका अपर्णा देशपांडे, पियुषा पवार, श्रद्धा मोरे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर कुवर यांनी केले आहे.

दरम्यान, महिला विकास फाउंडेशन या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट् महिलांच्या सर्वांगिण विकास, कौशल्य विकास व्हावा हे आहे. महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण तसेच महिलांचे आरोग्य व शिक्षण क्षेत्रात संस्था कार्यरत आहे. संस्थेचे कार्यालय पुणे येथील शनिवार वाड्याजवळ आहे. अधिक माहितीसाठी युवती आणि महिलांना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.