Pimpri News : जनसंवाद सभेत 109 नागरिकांच्या तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकांच्या आज (सोमवारी) झालेल्या दहाव्या जनसंवाद सभेत सुमारे 109 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. जनसंवाद सभेचे संचालन उत्कृष्ट असल्याबद्दल तसेच या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन त्यावर विहित वेळेत समाधानकारक कार्यवाही होत असल्याचे मत नागरिकांनी जनसंवाद सभेच्या निमित्ताने व्यक्त केले.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 22, 10, 10, 6, 6, 6, 28 आणि 21 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी तर “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी भूषवले. सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी या सभेस उपस्थित होते. मुख्य समन्वय अधिकारी यांनी जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन त्यावर संबधित यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. त्यामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणा-या वाढीव पदपथांची रुंदी कमी करावी, विजेच्या खांबावरील फ्लेक्स तसेच अनधिकृत फ़्लेक्स काढावेत, ओपन जिमचे काम लवकर पूर्ण करावे, अनधिकृत नळजोडणीवर करावी तसेच पाईपमधून होणारी पाणी गळती थांबवावी आणि पाणीपुरवठा स्वच्छ व योग्य दाबाने करावा, संपुर्ण शहरातील गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने करावे, रस्ता ओलांडण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी दुभाजक असावेत, धोकादायक असणा-या उघड्या चेंबरवर झाकणे बसवावित, शहरातील सर्व दिशादर्शक, वास्तु किंवा स्थळदर्शक नामफलक सुस्पष्ट असावेत, धोकादायक वृक्षांची छाटणी करावी, पावसाळ्यापूर्वी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सदनिका वितरीत करण्यात याव्यात, सफाई कर्मचारी नियमितपणे स्वच्छतेसाठी यावेत, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, पदपथ आणि दुकानासमोरील अतिक्रमणे हटवावी, पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजवावेत आणि उखडलेले रस्ते लवकर दुरुस्त करावे, नैसर्गिक प्रकाश असताना पथदिवे चालू ठेऊ नये, आवश्यक ठिकाणी सुलभ शौचालये उभारावित, रस्ता दुभाजाकामधील कचरा काढून तेथे सुशोभीकरण करावे, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा असावा, पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवा सुरु करावी. हॉकर्स झोनबाबत नियोजन करावे, विद्युत खांबावरील वेल काढावे. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारावेत, अतिक्रमण हटवलेल्या जागेत रस्ता रुंदीकरण लवकर करावे. मालमत्ता कर कमी येत आहे याची दखल घेऊन सुधारित मालमत्ता लवकर देण्यात यावा. ज्याचं पुनर्वसन करण्यात आले त्यांच्या तसेच अनधिकृत झोपड्या लवकर हटवाव्यात अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.