Baner News : महिला व्यावसायिकांना ‘घे भरारी’तून दिलासा ; आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – ‘लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून ग्राहकांची वाट पाहत असलेल्या या छोट्या व्यावसायिकांना ‘घे भरारी’तून मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रदर्शनात छोटे व्यावसायिक, महिला व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी अशा सगळ्यांनीच कलाकुसरीने साकारलेल्या दर्जेदार वस्तू आणि व्यवसायाचा दुर्दम्य विश्वास पाहायला मिळाला. अशा उपक्रमातून महिला सक्षमपणे आपला व्यवसाय विस्तारत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी चालवलेल्या ‘घे भरारी’ या फेसबुक ग्रुपच्या वतीने बाणेर रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी स्थानिक नगरसेविका अर्चना मुसळे, मिस टॉप ऑफ द वर्ल्ड 2018 विजेती मीनल ठिपसे, संयोजक राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी- यदलाबादकर आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन महिला व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या. हे प्रदर्शन येत्या 20 तारखेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड, धारवाडी खणापासून बनवलेले दागिने, पेपर फिंलिंग फ्रिज मॅग्नेट, ऍक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, भाज्या व फळासाठी फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या आदी वस्तू लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा असे पदार्थ, लहानांसाठी खेळण्यांचे असे एकूण 80 स्टॉल आहेत.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘मोठ्या काळानंतर लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या महिला व्यावसायिकांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल. औंध-बाणेर परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल. एरवी बाजारात पहायला न मिळणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण व कलात्मक वस्तू येथे मांडण्यात आलेल्या आहेत. यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे.’

‘समाजात या प्रकारचे उपक्रम राबविणे जाणे गरजेचे आहे’, असे अर्चना मुसळे म्हणाल्या. नोकरी सोडून लोकांनी हळुहळु व्यवसायात उतरावे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.