Punavale : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पती पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करत लोखंडी कोयत्याने वार करून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास विजयनगर माळवाडी, पुनावळे येथे घडली.

गौरी राहुल प्रतापे (वय 21, रा. विजयनगर माळवाडी, पुनावळे) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ रामदास बोरगे (वय 32, रा. विजयनगर, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल गोकुळ प्रतापे (वय 30 रा. विजयनगर माळवाडी, पुनावळे मूळ रा. घारगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो पत्नी गौरी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून तिच्या सोबत भांडण करत होता. मंगळवारी याच कारणावरून त्याने गौरी हिच्याशी भांडण केले. तसेच चिडून तिच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये गौरीचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302, भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), मुंबई पोलीस अधिनियम 37 (1), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी राहुल याला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.