Cricket Update: अवघ्या 7 मिनिटांत मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळाले, गॅरी कर्स्टन यांचा खुलासा

Cricket Update: I got the coaching job of the Indian team in just 7 minutes, revealed Gary Kirsten हे पद मिळण्यासाठी सुनील गावसकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

एमपीसी न्यूज- मला कोचिंग क्षेत्रातील अजिबात अनुभव नव्हता. मला कोचिंग क्षेत्रात करियर करायचे होते. पण फक्त सात मिनिटांत माझी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि माझा क्रिकेट प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश झाला. असा खुलासा भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी केला आहे.

गॅरी कर्स्टन म्हणाले की, 2007 मध्ये फक्त सात मिनिटांत मला भारतीय संघाचे प्रशिक्षक पद मिळले, आणि हे पद मिळण्यासाठी सुनील गावसकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

‘क्रिकेट कलेक्टिव’ या पॉडकास्ट दरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. कर्स्टन म्हणाले, सुनील गावसकर यांचा मला एक ई-मेल आला. ज्यामध्ये त्यांनी मला भारतीय संघाच्या प्रशिक्षक होण्याची इच्छा आहे का, असे विचारले होते.

मला वाटले ते मस्करी करत आहेत, म्हणून मी त्यांना नाही म्हणून कळवले. त्यानंतर त्यांचा आणखी ई-मेल आला. ज्यामध्ये त्यांनी मला मुलाखतीला येण्याची विनंती केली आणि मी होकार कळवला.

माझ्या अगोदर ग्रेग चॅपल यांच्या नावाचा देखील विचार करण्यात आला होता असे ते म्हणाले. मी जेव्हा मुलाखतीसाठी भारतात पोहोचलो तेव्हा तत्कालीन भारतीय कर्णधार अनिल कुंबळे माझ्या निवडीबद्दल साशंक होते.

कुंबळे यांनी जेव्हा मला विचारले की तुम्ही येथे काय करताय आणि मी म्हणालो की प्रशिक्षक पदाच्या मुलाखत देण्यासाठी आलोय तेव्हा आम्ही दोघे खळखळून हसलो होतो.

माझी मुलाखत सुरु असताना मला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. या समितीमध्ये रवी शास्त्री यांचा देखील समावेश होता. ही मुलाखत जवळ जवळ सात मिनिटे सुरु होती.

त्यानंतर माझ्या हातात करार पत्र सोपवण्यात आले आणि माझी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली असे गॅरी कर्स्टन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.