Dagadusheth Ganpati: विश्वकल्याणाकरीता सुदर्शन यागाने ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर यज्ञ-यागांना प्रारंभ 

एमपीसी न्यूज – जगभरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी विश्वकल्याणाकरीता दगडूशेठ गणपतीसमोर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये यज्ञ-यागांना सुदर्शन यागाने आज प्रारंभ झाला. संपूर्ण सृष्टीचे पालक असलेल्या भगवान विष्णूंच्या यागाद्वारे जनकल्याणार्थ प्रार्थना करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरामध्ये ढुंडीराज तथा अधिक मासानिमित यज्ञ-याग व चार वेदांच्या संहितेचे पठण आयोजित केले आहे. ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह यज्ञ-यागासारखे धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत सुरु आहेत. दरम्यान, सुदर्शन याग हा विश्वाचे पालक भगवान विष्णूंचा याग वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली झाला.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, भारतीय कालगणनेकरिता दोन पद्धतींचा उपयोग केला जातो. एकास सौरमास म्हणतात तर दुसरीस चांद्रमास असे म्हणतात. या दोन गणनांमध्ये प्रतिवर्षी सुमारे तेरा दिवसांचा फरक पडत जातो. त्यामुळे सुमारे तीन वर्षांनी अशी एक परिस्थिती येते की एका चांद्रमासाच्या काळात सूर्याचे राश्यांतर घडतच नाही. अशा या चांद्र्रमासास ज्योतिष शास्त्राच्या परिभाषेत अधिकमास असे म्हणतात. संपूर्ण चांद्रमासात सूयार्चे एकाच राशीत स्थिर असणे या गोष्टीचा स्थिरतेशी संलग्न रूपात विचार करीत या काळातील सगळ्याच सत्कर्मांना स्थैर्य लाभते. या भूमिकेतून हा काळ धर्मशास्त्राने व्रत काल रूपात महत्त्वाचा मानला आहे.

ते पुढे म्हणाले, सध्याच्या काळात विष्णू प्रधान स्वरूपानुसार यास पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या काळात विष्णू स्मरण, पूजन, रूप विविध पवित्र्य कार्यास सर्वत्र प्राधान्य दिलेले पहावयास मिळते. गाणपत्य सांप्रदायाच्या भूमिकेतून या महिन्यास श्री ढुंढीराज मास म्हणण्याची पद्धती आहे. भगवान श्रीगणेशांच्या श्री ढुंढीराज स्वरूपाची उपासना या काळात विशेष साधन रूपात वर्णिलेली आहे,असेही त्यांनी सांगितले.

मंदिरामध्ये ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ॠग्वेदातील 10627 मंत्रांचे, यर्जुवेदातील 1975 मंत्रांचे, सामवेदातील 1875 मंत्रांचे आणि अथर्ववेदातील 5977 मंत्रांचे असे चार वेदांचे संहिता पारायण सुरु झाले आहे. अधिक मासामध्ये केलेली प्रार्थना अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे अधिक प्रमाणात गणरायापर्यंत पोहोचते, या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांची श्री गणेश पुराण कथा मालिका दिनांक 16 ​ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी 4 वाजता दगडूशेठ गणपती या ट्रस्टच्या अधिकृत यू टूयब पेजवर पहायला मिळणार आहे.

मंदिर बंद असून ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, IOS: http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/Dagdusheth_Android_App या लिंकवरुन भक्तांना सहभागी होता होईल. तरी भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.