Dapodi News : पिंपरी चिंचवडकरांनो सावधान! विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सोबतच केली जातेय कोरोना टेस्ट

पॉझिटिव्ह आलात तर व्हावे लागणार 14 दिवस क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – विनामास्क फिरणाऱ्या, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र त्यापुढे जाऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जे नागरिक पॉझिटिव्ह येतील त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो विनाकारण घराबाहेर फिरत असाल तर सावध व्हा. तुमच्या शेजारी, आसपास वावरणारा व्यक्ती देखील पॉझिटिव्ह असू शकतो. तुमचे एक बेजबाबदार पाऊल तुम्हाला कोरोनाच्या खाईत ओढू शकते, असा सल्ला पिंपरी चिंचवड पोलीस देत आहेत.

दापोडी मार्केटमधील सुमारे सव्वाशे विक्रेत्यांना आज (गुरुवारी, दि. 22) पिंपरी चिंचवड पोलिसांनी मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. महापालिकेचे भोसरी रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने त्या विक्रेत्यांची दापोडी पोलीस चौकीत अँटिजेन टेस्ट देखील करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या विक्रेत्यांना सामाजिक अंतर तसेच अन्य नियमांचे महत्व पटवून दिले.

त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासोबतच त्यांची देखील पोलिसांनी कोरोना अँटीजेन टेस्ट केली. या टेस्टिंगमध्ये आज सकाळपासून सात ते आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णांना काहीही लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. तर सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यामुळे कारवाईसोबतच पोलिसांनी आता जनजागृती देखील सुरू केली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “कोरोनाचा प्रसार फार वेगाने होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं सध्या जिकरीचे झाले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. ही मोहीम पुढे वाढवून पोलिसांकडून जनजागृतीपर काम देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोडी बाजारपेठेत विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करून त्यांची जनजागृती करण्यात आली आहे. दापोडी पोलीस चौकीमध्ये अँटिजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दापोडी चौकीतील कॅम्पमध्ये आणून त्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यात पॉझिटिव्ह आल्यास पुढील कार्यवाही देखील पोलीस करत आहेत.

आपल्यासोबत राहणारा, आसपास वावरणारा व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असू शकतो. त्याचे इन्फेक्शन आपल्याला होऊ शकते. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावी. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वेळोवेळी हात-पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन देखील सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.