Delhi : कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले -सर्वोच्च न्यायालय; न्यायालयात उद्या सकाळी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले, असा सवाल उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने उद्या सकाळी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील सरकार स्थापनेचा पेच उद्यावर (सोमवारी) गेला आहे. तसेच यातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच हा रविवारी (दि. 24) सर्वोच्च न्यायालयात पोहचला. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी केली. मात्र, अनेक सवाल उपस्थित झाल्याने महाराष्ट्र राज्यातील सरकार स्थापनेचा पेच आता उद्यावर (सोमवारी) गेला आहे. यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला निमंत्रण देण्याचा निर्णय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घेतला. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उद्या सकाळी 10.30 वाजेपर्यंत सादर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सरकारच्या वतीने बाजू मांडतांना तुषार मेहता म्हणाले, ‘न्यायालयाने आदेश दिल्यास राज्यपालांनी जो निर्णय घेतला, त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करू,’ असे सांगितले होते. आजची सुनावणी करताना न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थिती करता येणार नाही, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर पुन्हा उद्या सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने रविवारी कोणताही निकाल दिला नाही. याप्रकरणी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.