Dehuroad : एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या!

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे बंदोबस्तावर असताना अचानक मध्यरात्री घरी आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पती हॉलमध्ये झोपले असल्याने हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला.

सरस्वती किसन वाघमारे (वय 29, रा. विकासनगर, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. वाघमारे ह्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. मात्र, कार्तिकी एकादशीनिमित्त देहूगाव येथे बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक केली होती. मागील काही दिवसांपासून त्या बंदोबस्तावर होत्या. शनिवारी त्यांना नाईट ड्युटी असल्याने त्या रात्री नऊच्या सुमारास देहूगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या. सकाळी साडेनऊ वाजता त्या घरी येणार असल्याचे सांगून गेल्या होत्या.

मात्र, रविवारी (दि. 24) मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या अचानक घरी आल्या. त्यांचे पती विकास पांडुरंग झोडगे (वय 35) यांनी लवकर येण्याबाबत विचारले असता सरस्वती काहीही न बोलता बेडरूममध्ये गेल्या. झोपेची वेळ असल्याचे विकास यांनी देखील जास्त माहिती न घेता झोपी गेले. सकाळी सव्वासातच्या सुमारास विकास पत्नी सरस्वती यांना झोपेतून उठवण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले असता त्यांनी दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले.

सरस्वती यांचे पती विकास जातपडताळणी कार्यालय येरवडा येथे मानधन तत्वावर नोकरीस आहेत. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या म्हणण्यानुसार ‘सरस्वती कर्जबाजारी होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.” तर, पती-पत्नीचे भांडण झाले आणि त्या रागातून वाघमारे यांनी आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांचे म्हणणे आहे. सरस्वती यांचे वडील किसन वाघमारे यांची फिर्याद घेण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.