Talegaon News : शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांवर अन्याय, शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई मागणी

एमपीसी न्यूज :  – शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून काही शाळांमधील इयत्ता नववीतील अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जात नाही. त्याच वर्गात ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

पर्याय म्हणून इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा फॉर्म नंबर 17 भरण्याचा पर्याय सुचविला जातो. ही बाब गंभीर असून संबंधित शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे  यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना विशाल वाळुंज, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र दाभाडे, महेश फलके आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता नववीच्या वर्गात दोन वर्षे विद्यार्थ्यांना ठेवल्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेले विद्यार्थी आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग खुला करणे आवश्यक आहे. गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.मानसिक त्रास विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही होत आहे. शाळेविरुद्ध तक्रार करण्यास पालक घाबरतात. असेही म्हटले आहे.

प्रवेश नाकारणा-या शाळेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आलेल्या असून याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चु कडू,  प्रधान सचिव मंत्रालय मुंबई आदीं मंत्री महोदयांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या असून या तक्रारींबाबत प्रत्यक्ष मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून शाळेची चौकशी करून विद्यार्थ्यी व पालक यांना न्याय मिळवून देण्याची विनंती ही निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.