IPL 2022 NEWS : अखेर मुंबई इंडियन्सने मिळवला या हंगामातला पहिला विजय, 5 गडी राखून राजस्थान रॉयल्सला नमवले.

 सूर्यकुमार यादव ठरला विजयाचा नायक

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) : पाच विक्रमी वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला 2022 च्या टाटा आयपीएल मध्ये सलग 8पराभव झाल्यानंतर पहिला विजय मिळवण्यात शेवटी यश आलेच. कर्णधार रोहीत शर्माच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संघाने आपल्या लाडक्या कर्णधाराला विजयी भेट देऊन त्याचे दुःख  काही प्रमाणात का होईना पण नक्कीच कमी केले आहे,अर्थात या विजयाने ना मुंबई संघाला फार फायदा होणार नाही पण मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवण्यात आलेले यश त्यांच्या चाहत्यांचा रोष काही प्रमाणात का होईना पण नक्कीच आनंद देणारा आहे,जबरदस्त फलंदाजी करत आणखी एक अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार यादव सामन्याचा मानकरी ठरला.

काल रोहीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारन केले, राजस्थानसाठी या मोसमात सर्वाधिक धावा करणारा जॉस बटलर आणि देवदत्त पडीकल यांनी डावाची सुरुवात केली खरी, पण पडीकल आजही फारसे काही चांगले करू शकला नाही आणि केवळ 15 धांवा काढून रितीक शौकीनच्या गोलंदाजीवर  झेलबाद झाला,यावेळी राजस्थानच्या फक्त 26 धावा झाल्या होत्या, ज्यात फक्त 28 धावांची भर पडलेली असताना कर्णधार संजू सॅमसनही नवोदित कुमार कार्तिकेयनच्या गोलंदाजीवर 7 चेंडूत दोन षटकारासह 17 धावा करून बाद झाला.

यानंतर मात्र बटलरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत मिचेल सिंटनेरच्या साथीने राजस्थानचा डाव सावरायला सुरुवात केली,या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 37 धावांची छोटी भागीदारी केली आणि नेमके याचवेळी सिंटनेरचा संयम सुटला,तो ही 20 चेंडूत 17 धावा काढून सॅम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला,यानंतर वैयक्तिक 14वे अर्धशतक पूर्ण करून जॉस बटलरही वैयक्तिक 67 धावांवर असताना शौकीनच्याच गोलंदाजीवर बाद झाला, त्याने या धावा करताना राजस्थान रॉयल्ससाठी एका मोसमात सर्वाधिक 566 धावा करुन एक नवीन विक्रम आपल्या नावावर करताना रहाणेचा 2012 मधला 560 धावांचा विक्रम पादाक्रांत केला,

बाद होण्याआधी त्याने शौकीनला  चार षटकार मारत आपला तडाखा दाखवला होता, पण तो बाद झाल्यावर रियान पराग ही स्वस्तात बाद झाल्यानंतर रवीचंद्रन अश्विनने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करत फक्त 9 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत 21 धावा केल्या आणि आपल्या संघाला 158 धावांची मजल मारून दिली.मुंबईसाठी शौकीन आणि मेर्डीथने दोन दोन बळी घेतले.
159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात पुन्हा एकदा खराबच झाली,

बर्थडे बॉय आणि कर्णधार रोहीतचा आपल्या बॅटशी अबोला आजही कायम राहिला आणि तो फक्त 2 धावा करुन रवीचंद्रन अश्विनची शिकार ठरला, त्याने सूर्यकुमार यादवला तिसऱ्या नंबरवर पाठवले आणि मुंबईसाठी हा हंगामात सातत्याने धावा करत असलेल्या या प्रतिभावंत खेळाडूने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करत मुंबई संघाला आपल्या पहिल्या विजयाच्या समीप आणण्यात मोठा वाटा उचलला,त्याला आज ईशाननेही बऱ्यापैकी साथ दिली,

ईशानवर सध्या खूप टीका होतं आहे,मात्र त्या टिकेने व्यथित न होता त्याने आपल्या खेळावर लक्ष्य देत आपल्याला सूर सापडतोय असा संदेश देत 18 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकात मारत 26 धावा केल्या,पण त्याला या चांगल्या सुरुवातीचे मोठया खेळीत रूपांतर करता आले नाही आणि तो बोल्टच्या चेंडूवर यष्ट्टीमागे सॅमसनच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मात्र सूर्यकुमार आणि तिलक वर्मा या जोडीने सुंदर फलंदाजी करत एक चांगली भागीदारीही केली आणि आलेले सर्व दडपणही झुगारून लावले.या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवले,

ही जोडीच विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच प्रथम सूर्यकुमार 51 धावा काढुन चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला,तर दुसऱ्या षटकात तिलक वर्माही 35 धावा काढुन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला,हे दोन्हीही झेल रियान परागनेच घेतले, लागोपाठ दोन बळी आणि ते ही साठी झालेले फलंदाज, यामुळे सामन्यात पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली, त्यातच पोलार्डचा धावा काढण्यासाठीचा संघर्ष पाहून अनेकदा मनात पराभवाची पाल चुकचुकली.यावेळी रोहीत शर्मावर सतत कॅमेरा जात होता आणि त्याचे टेन्शन स्पष्टपणे दिसत होते, आणि क्रिकेट हा खेळ किती अनिश्चित आहे

याची प्रचिती मनाला पटतही होती.मात्र पोलार्ड धावांसाठी झगडत असताना टीम डेविडने मात्र कसलीही तमा न बाळगता आक्रमक फटकेबाजी करत विजय आणखी जवळ आणला, शेवटच्या षटकात चार धावा हव्या असताना पोलार्ड कुलदीपसेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि सामना पुन्हा एकदा रंगतदार होईल असे वाटायला लागले, पण त्याच्या जागेवर आलेल्या सॅम्सने पुढच्याच चेंडूला मैदानाच्या बाहेर भिरकावून देत मुंबई इंडियन्सला या मोसमातला पहिला विजय मिळवून देत पहिल्या आठ पराभवाचे दुःख काही अंशी का होईना कमी करण्यास हातभारही लावला.

या विजयाने मुंबई संघाला फारसा फायदा होणार नसला तरी पुढील सामन्यात त्यांना याच विजयाने नवी उमेद मिळावी आणि त्यांनी किमान आपल्या वैभवशाली परंपरेला काही प्रमाणात तरी जतन करत शेवटच्या स्थानावरून पहिल्या पाच सहा मध्ये तरी जागा मिळवावी इतकीच अपेक्षा त्यांचे समर्थक करत असतील.सूर्यकुमार यादवला त्याच्या अर्धशतकी खेळीने सामन्याचा मानकरी हा मान मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स
6 बाद 158
बटलर 67,अश्विन 21,सॅमसन 16 मिचेल 17
शौकिन 47/2,मेर्डीथ 24/2
पराभूत विरुद्ध
मुंबई इंडियन्स
19.2 षटकात 5 बाद 161
सूर्यकुमार 51,तिलक 35,टीम डेव्हिड नाबाद 20
बोल्ट 26/1,सेन 29/1,कृष्णा 29/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.