Pune News: ‘वर्दीतील देवदूत’ समीर बागसिराज यांचा गृहमंत्र्यांनी केला विशेष सन्मान

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई महामार्गावरील वारजे पुलानजीक अपघातग्रस्त चारचाकीतून जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलीला तातडीने रुग्णालयात नेणारे वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी आज (रविवारी) पुणे येथे त्यांचा विशेष सत्कार केला.

पुणे-मुंबई महामार्गाच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरील वारजे पुलावर गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाला. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे अपघातग्रस्त कुटुंबाला वाचविण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचणे अवघड होते, परंतु वारजे वाहतूक शाखेचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एवढ्या भयानक गर्दीतसुद्धा प्रसंगावधान बाळगत त्यांनी अवघ्या कुटुंबाला जीवनदान दिले. या कर्तव्यदक्षतेमुळे पोलीस नाईक समीर बागसिराज आणि रिक्षाचालक राम नवले यांच्यावर समाजमाध्यमांतून कौतुकाचा वर्षाव झाला.

या प्रसंगानंतर मंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा ट्वीट करून या जीगरबाज कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसाचे कौतुक केले होते. पाटील म्हणाले, कौतुकास्पद आणि अभिमानास्पद! पुणे येथील वारजे पुल परिसरात झालेल्या अपघातात जखमी मुलीला वाचविण्यासाठी समयसूचकता दाखवत वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत!

राज्याचे गृहमंत्री यांनी देखील पोलीस खात्याची मान उंचावणाऱ्या बागसिराज यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सत्कार केला व पाठीवर शाबासकीची थाप दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.