Talegaon Dabhade : भव्य सायकल रॅलीच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त मावळचा संकल्प

एमपीसी न्यूज :  तळेगावातील सर्व शैक्षणिक संस्था आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “मेगा मावळ सायक्लोथॉन” या भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार (दि 31)  रोजी करण्यात आले आहे.

“नित्य सायकलची कसरत, होईल स्वस्थ भारत” हेच घोषवाक्य आत्ताच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा उद्देश तसेच मावळ तालुका प्रदूषण मुक्त व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून तळेगावातील सर्व शैक्षणिक संस्था व लायन्स क्लबचा या रॅलीच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा मानस आहे.

ही भव्य रॅली थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या(मारुती मंदिर चौक) प्रांगणापासून सकाळी सात वाजता सुरु होणार आहे.याचा मार्ग पुढे जिजामाता चौक, काका हलवाई – भुयारी मार्ग – स्वप्ननगरी, इंद्रायणी कॉलेज चाकणरोड स्टेशमार्गे परत जिजामाता चौकातून समारोप नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात होईल.

या रॅलीचा 6 किलोमीटर अंतराचा टप्पा निर्धारीत करुन यशस्वीपणे पूर्ण करायचा आहे. पुणे जिल्हयातील सर्वात मोठी भव्य रॅली आपल्या तळेगावात होणार आहे. मेगा मावळ सायक्लोथॉनचे विशेष नियोजन नम्रता ग्रुप यांनी केले आहे. रॅली यशस्वीरित्या पूर्ण करणा-या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे.

विशेष आनंदाची बाब म्हणजे याप्रसंगी तळेगाव पोलीस स्टेशनला चार सायकल भेट म्हणून देण्याचे लायन्स क्लबच्या मार्फत जाहिर करण्यात आले आहे. या प्रसंगी मावळ प्रांत संदेश शिर्के प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

तळेगाव नगरपालिका मुख्याधिकारी दीपक झिंजाड, पोलिस स्टेशनचे पी.आय. भास्कर जाधव, लायन्स क्लब प्रांतपाल डॉ.दीपक शहा, आयर्नमॅन विशाल शेटे नम्रता ग्रुपचे लायन शैलेश शहा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. “मावळ प्रदूषण मुक्त करुया चला सायकल चालवू या” हेच घोषवाक्य सार्थ करुन आपण सर्वांनी या भव्य सायकल रॅलीचा आनंद उपस्थित राहून द्विगुणीत करावा. अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.