Metro News : मेट्रो स्थानकावर तिकीट स्कॅनिंगसाठी अडचणी

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरु झाली आहे. नागरिकांनी देखील मेट्रोला पसंती दिली असून दररोज शेकडो नागरिक मेट्रोतून प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र नागरिकांना मेट्रो स्थानकांवर प्रवास करताना तिकीट स्कॅन करावे लागते. स्थानकावरील तांत्रिक अडचणींमुळे तिकीट स्कॅनिंगसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागते.

पुणे मेट्रोचे पहिले तिकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. त्यांनी मेट्रोतून प्रवास देखील केला आणि पुणे मेट्रो नागरिकांसाठी खुली झाली. मेट्रो सुरु होऊन आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत मेट्रो स्थानकावर नागरिकांना काही अडचणी येत आहेत. सध्या बहुतांश नागरिक मेट्रोचा वापर पर्यटनासाठी करत आहेत. मेट्रोत बसण्याची मजा, अनुभव नागरिक घेत आहेत.

रिटर्न तिकीट काढल्यानंतर शेवटच्या स्थानकावर उतरून तिकीट काउंटर असलेल्या पहिल्या मजल्यावर प्रवाशांना जावे लागते. तिकीट स्कॅन करून पुन्हा दुस-या प्लॅटफॉर्मवर जावे लागते. दरम्यान तिकीट स्कॅन करण्यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. तिकीट स्कॅन न झाल्याने पुढे प्रवेश मिळत नाही.

तिकीट स्कॅन न झालेल्या प्रवाशांसाठी जवळच मदत केंद्र आहे. तिथून तिकीट स्कॅन करून पुढे जावे लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळ जातो. या मदत केंद्रावर प्रवाशांची गर्दी असल्यास मेट्रो निघून गेल्याचेही प्रसंग अनेक प्रवाशांवर आले आहेत. एक मेट्रो गेल्यानंतर अर्ध्या तासाने दुसरी मेट्रो असते. तिकीट स्कॅन न झाल्याने नागरिकांचा अर्धा तास मेट्रो स्थानकात जातो.

मेट्रोने ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत. पुढे मेट्रोला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर या गर्दीत वाढ होणार आहे. सध्याच्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अनेक पटींनी गर्दी वाढल्यास नागरिकांना मेट्रो प्रवास म्हणजे मनस्ताप वाटायला नको, असेही नागरिक म्हणत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.