Maval NCP News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही निवड जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

पक्षाच्या संघटनात्मक धोरणानुसार मागील आठवड्यात तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला होता.

रविवार (दि 13) सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश खांडगे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. त्यावेळी आमदार सुनिल शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

आपली राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी मावळ तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले असून त्यांच्या निष्ठेचे आज फलित झाले. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले गणेश खांडगे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांची कारकीर्द उठावदार झाली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तर मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कुलचे संस्थापक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळावर संचालक आणि तळेगाव जनरल हॉस्पिटलचे उपाध्यक्ष म्हणूनही खांडगे कार्यरत आहेत.

तसेच तळेगाव नगरपरिषदेतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कला, क्रिडा, सामाजिक व वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी आमदार सुनिल शेळके व पक्षातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने, प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास खांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोण आहेत गणेश खांडगे?

मावळ तालुक्याच्या राजकारणात गणेश खांडगे यांचे दिवंगत आजोबा मामासाहेब खांडगे यांचा ‘सक्रिय’ सहभाग होता . मामासाहेब खांडगे पुणे जिल्हा लोकल बोर्डावर सदस्य म्हणून मावळचे प्रतिनिधीत्व करत होते. गणेश खांडगे यांचे वडील वसंतराव खांडगे यांनीही तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये ‘नगरसेवक’ म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. आजोबा व वडील यांच्या विचारांचा वारसा जपत गणेश खांडगे गेली 30 वर्ष राजकारणात सक्रिय सहभागी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांची प्रेरणा घेवून सार्वजानिक जीवनात काम करीत आहेत.

गणेश खांडगे यांच्या प्रयत्नाने तळेगाव दाभाडे येथे मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था 1996 मध्ये सुरू झाली. गेली 25 वर्षे ते या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सक्षमपणे संभाळत आहे. पतसंस्थेस अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पतसस्थेचे व्यवस्थापन व संचालन उत्तम असल्यामुळे खांडगे यांना पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन तसेच महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनवरही संचालक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कामात मोलाचा सहभाग आहे. खांडगे यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन पक्षाने त्यांच्यावर मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. सात वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामामुळे गाव पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मजबूत फळी सध्याही कार्यरत आहे .

गणेश खांडगे यांच्याकडे सध्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तळेगाव दाभाडे येथील ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्या-या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेच्या उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. याच परिसरात माझ्या कुटुंबीयांच्या माध्यमातून मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलची उभारणी करण्यात आली. या भव्य वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर या नामवत शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचा संचालक म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे.

तळेगाव जनरल हॉस्पिटल अँण्ड कॉन्व्हलसंट होम या आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संस्थेच्या  नियामक मंडळाचा ते उपाध्यक्ष आहे . तळेगाव दाभाडे नगरपरिषेदेवर विद्यमान नगरसेवक असून यापूर्वी उपनगराध्यक्ष, पक्षनेता व विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सभापतीपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यांच्या पत्नी अनुपमा खांडगे श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या संचालक म्हणून काम पाहतात.

त्रिदल या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तालुक्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा मावळ भूषण हा पुरस्कार देऊन त्यांनी तालुक्याच्या  सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.