Dighi News : राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे गरजेचे – जनरल मनोज पांडे

एमपीसी न्यूज : “राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती (Dighi News) सोपविता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशात संशोधन व विकास याला चालना मिळत असून, लष्करात ही त्यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशील लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदी क्षेत्रात प्रगती होत आहे,” असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) 29 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोज पांडे बोलत होते. कल्याणी ग्रुप, भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष, प्रसिद्ध ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर पहिल्या बॅचचे विद्यार्थी समीर मैनी (संस्थापक अध्यक्ष -कोलॅबरेशनरूम.एआय, वाशिंग्टन, अमेरिका) यांना यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘एआयटी’च्या रमन थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी ‘एआयटी’चे चेअरमन मेजर जनरल टी. एस. बेन्स, संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट, सहसंचालक कर्नल एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, मेजर जनरल आर. के. रैना यांच्यासह अनेक सेवानिवृत्त अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी, एआयटीचे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. 1998 च्या पहिल्या बॅचचा रौप्यमहोत्सव यावेळी साजरा करण्यात आला.

जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर (Dighi News) कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ बेस्ट ऑल राउंडर ट्रॉफी माहिती तंत्रज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या आकाश भाटी याला, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार राजशेखर करंडक संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी भावना निम्मगड्डा हिला, तर सर्वोत्कृष्ट इनोव्हेशनसाठी राजपूत रेजिमेंट ट्रॉफी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी अभिनव प्रताप चौहान याला देण्यात आली.

संगणक अभियांत्रिकी शाखेच्या अंशू गुप्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीच्या महेश भोसले, माहिती तंत्रज्ञान शाखेच्या कुणाल खानरा आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या हर्षवर्धन सिंग यांना त्यांच्या संबंधित शाखेत प्रथम स्थानासाठी ‘जिओसी-इन-सी’ पारितोषिक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट संशोधन व सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार संगणक विभागाचे प्रा. डॉ. सागर राणे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यक कर्मचारी (बेस्ट नॉन-टीचिंग टेक्निकल स्टाफ अवॉर्ड) स्वाती साळुंखे यांना, तर सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, प्रशासन विभागातील अविनाश भोसले यांना देण्यात आला.

जनरल मनोज पांडे म्हणाले, “आपल्या राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान नवकल्पना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘एआयटी’ने गेल्या 25 वर्षांमध्ये संरक्षण दलाला उत्तम अधिकारी, चांगले अभियंते, उद्योजक दिले आहेत.

आज प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि त्यांच्या मातृसंस्थेचा अभिमान बाळगत आहेत. शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी व्यावहारिक आणि अंमलबजावणीयोग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता राष्ट्राच्या प्रवासात महत्त्वपूर्ण आहे. आव्हाने मर्यादित (Dighi News) करण्यापेक्षा मर्यादांना आव्हान देत त्यावर मात करता आली पाहिजे.”

सत्काराला उत्तर देताना पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी म्हणाले, “या पुरस्काराचा नम्रपणे स्वीकार करतो. हा सन्मान माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, आजवर केलेल्या कार्याचा गौरव आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मला योगदान देता येतेय, याचा आनंद व अभिमान वाटतो.

भारतीय उद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून, आयात करणारा देश अशी ओळख पुसून काढत उत्पादक देश व निर्यात करणारा देश म्हणून ओळख बनत आहे. तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप, इनोव्हेशन या गोष्टींच्या बळावर भारत आत्मनिर्भर होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात प्रगती करत आहे. भारताकडे युवाशक्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या युवा पिढीने देशाच्या रचनात्मक प्रगतीमध्ये आपण योगदान कसे देऊ शकू, यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे.”

Pimpri Chinchwad : गावठी पिस्टल व धारदार शस्त्रासह तीन सराईत गुन्हेगारांना अटक

व्हिडीओ संदेशाद्वारे समीर मैनी म्हणाले, “यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आनंद झाला आहे. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशात ‘एआयटी’चा मोठा वाटा आहे. येथील सर्व शिक्षक, सहकारी विद्यार्थी यांनी आमच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेताना राष्ट्रासाठी, समाजासाठी काम करण्याची भावना रुजवायला हवी.”

स्वागत-प्रास्ताविकात ब्रिगेडियर अभय भट यांनी ‘एआयटी’च्या मागील वर्षभरातील कामगिरीचा व प्रगतीचा संक्षिप्त आढावा घेतला. शैक्षणिक व अवांतर, क्रीडा प्रगतीसह ‘एआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्लेसमेंट्सविषयी सांगताना माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे आणि राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले. अभिषेक कुमार मील आणि आशना वेद यांनी सूत्रसंचालन केले. मेजर जनरल टी. एस. बेन्स यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.