Pune News : त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा, अफजल खान वध देखाव्यावरून हिंदू महासंघाची टोकाची भूमिका

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या संगम तरुण मंडळाच्या अफजलखान वधाच्या देखाव्याला कोथरूड पोलिसांनी परवानगी नाकारली. आणि त्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटला आहे. हिंदू महासंघाने याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी संगम तरुण मंडळाला पाठिंबा देत अफजल खान वधाचा देखावा दाखवल्यावर कुणाच्या भावना दुखावणार असतील तर त्या भावना खड्ड्यात गेल्या, असे म्हणत संगम तरुण मंडळाला पाठिंबा दिला आहे. 

आनंद दवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कसा मारला होता त्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. हा इतिहास जाहीरपणे दाखवल्यावर मुस्लिमांच्या भावना दुखावतात असा नवीन शोध पोलीस अधिकाऱ्यांनी लावला आणि हा देखावाच रद्द करण्याची नोटीस काढली. अशी नोटीस काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आनंद दवे यांनी केली.

संगम तरुण मंडळाचे यंदा 56 वे वर्ष आहे. यावर्षी त्यांनी अफजलखानाचा वध हा जिवंत देखावा सादर करण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी कोथरूड पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली आहे. मात्र कोथरूड पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत या मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यावरूनच या वादाला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.