Crime News : सिंहगड रस्त्यावरून चंदन चोरांची टोळी गजाआड, 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने चंदन चोरांच्या टोळीला अटक केली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ थांबलेल्या या टोळीतील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.त्यांनी केलेले सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30) आणि रामदास शहाजी माने (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या या चौघांची नावे आहेत.

आरोपींनी आतापर्यंत पुणे शहरातील दत्तवाडी, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी, उत्तम नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदनचोरी केल्याचे समोर आले आहे. एनडीए व सहकारनगर परिसरात एका शाळेच्या आवारात झालेल्या चंदन चोरीचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत होते. तपासा दरम्यान त्यांनी अशोक मच्छिंद्र तांदळे याला अटक केली होती.चोरलेले चंदनाचे हे झाड त्याने दुसऱ्यांना विकले होते. त्या व्यक्तीचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. मात्र त्याच्या घरातून पोलिसांनी वजन काटा आणि चंदनाचे लाकूड जप्त केले होते.

दरम्यान उत्तमनगर परिसरातील चंदनचोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यातील आरोपींकडे विचारपूस केली असता वरील आरोपींची माहिती मिळाली होती. हे सर्वजण सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ थांबल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी आतापर्यंत सहा ठिकाणी चंदन चोरी केल्याचे कबूल केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.