Cyclone Nisarga Pune : निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला फटका; जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द स्तरावर सुरू. Due to cyclone Nisarga electricity outage in many parts of Pune district including Pune, Pimpri Chinchwad & Maval areas.

एमपीसी न्यूज – जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द स्तरावर सुरू केले आहे.

निसर्ग चक्री वादळासह झालेल्या पावसाने विविध भागात वीजपुरवठा बाधित झाला. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे.

याशिवाय झाडाच्या फांद्या वीज वाहक तारांवर पडल्याने तसेच वा-यामुळे वीज वाहक तारा तुटल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पुणे जिल्ह्यात बुधवारी (दि. 3) सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीज यंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.

यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 2) रात्रीपासून वादळी वा-यासह सुरू असलेल्या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदारांचे कामगार अहोरात्र काम करीत आहेत.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रंमाणात नुकसान झाले असून हे चक्री वादळ राज्यात दोन दिवस घोंघवर असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज आहेत. या वादळाच्या अनुषंगाने एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.

नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, घाबरू नये. प्रशासन आणि वीज कंपन्या आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, असेही ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.