Pune : सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था राखण्यासाठी विद्यापीठाकडून सुलभ इंटरनॅशनलची मदत

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या व भेटी देणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था पाहण्यासाठी ‘सुलभ इंटरनॅशनल’ या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीपासून (दि. 2 ऑक्टोबर) ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेशिवायही मोठ्या संख्येने नागरिक विद्यापीठाच्या आवारात येत असतात. त्यांच्यासाठी सोय म्हणून रसायनशास्त्र विभागाच्या समोरील एटीएम केंद्राजवळ तसेच, प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगशेजारी अशा दोन ठिकाणी तीन वर्षांपूर्वी शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यात अपंग व्यक्तिंचीही सोय केलेली आहे.

मात्र, त्या ठिकाणाहून नळ चोरीला जाणे, शौचालयांची नासधूस होणे असे अनेक प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता त्या ठिकाणी व्यक्ती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीच आता ‘सुलभ इंटरनॅशनल’ची मदत घेतली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च विद्यापीठ उचलणार आहे. नागरिकांना ही सुविधा विनामूल्य वापरता येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.