Pune : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सोमवारपासून वन्यजीव सप्ताह

एमपीसी न्यूज :  महानगरपालिकेच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दि. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, वन्यजीवविषयक व्याख्यानमाला, चित्रकला, रांगोळी, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, पथनाट्य, वाईल्डलाईफ, चालता-बोलता पपेट शो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीव सप्ताह हा संपूर्ण देशात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि जनजागृती करण्याकरिता साजरा करण्यात येतो. याची पहिली सुरूवात १९५८ साली लुप्त होणा-या प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोकांचा सहभाग वाढविण्याकरिता करण्यात आली.

या सप्ताहामध्ये वन्यजीव व पर्यावरण संरक्षण या विषयावर आज (१ ऑक्टोबर), टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन तसेच पुढील प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे २ ऑक्टोबरला चित्रकला, ३ ऑक्टोबरला रांगोळी, ४ ऑक्टोबर रोजी चालता-बोलता, वाईल्डलाईफ हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम तर, ६ ऑक्टोबर रोजी सर्व अबालवृद्धांसाठी पर्यावरण संरक्षण विषयावर पपेट शो आणि पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय दररोज व्याख्यानमालेतून वन्यजीव संरक्षणाविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. स्पर्धे दरम्यान विद्यार्थीनी काढलेल्या चित्रांचे व रांगोळीचे प्रदर्शन नागरिकांना पाहण्याकरिता संपूर्ण सप्ताह उपलब्ध असणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.