Bhosari : आर्थिक मदतीविना अंध विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड; प्रकाशालय संस्थेचा निकाल शंभर टक्के

एमपीसी न्यूज – अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या ऊर्जा प्रतिष्ठान संचालित प्रकाशालय संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. संस्थेतील सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. बिकट परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच यामुळे समाजात पराभवाच्या नैराश्यातून खचून जाणा-यांना चांगली प्रेरणा देखील मिळाली आहे.
बिकट परिस्थितीवर मात करणारे हे प्रज्ञाचक्षू विविध अडचणींचा सामना करीत आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांना योग्य साहित्य उपलब्ध होत नाही. यात त्यांच्या अभ्यासाची मोठी हेळसांड होते. प्रकाशालय संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही. त्यांनी रेकॉर्डिंग आणि इतरांनी वाचलेलं ऐकून संपूर्ण तयारी केली. यावर त्यांनी उत्तम यश मिळवले आहे. यामध्ये संस्थेचे पंकज कुलकर्णी यांची त्यांना मोठी मदत मिळाली.
ऊर्जा प्रतिष्ठान संचालित प्रकाशालय ही संस्था भोसरी मधील पंकज कुलकर्णी चालवतात. मागील तीन वर्षांपासून ही संस्था अंध विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. दरवर्षी या संस्थेचे काही विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देतात. संस्थेला आर्थिक पाठबळ नसल्याने विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजवर संस्थेने केवळ धान्य स्वरूपात मदत घेतली. कुणाकडून देखील आर्थिक मदत संस्थेने स्वीकारलेली नाही. पंकज कुलकर्णी यांनी व्यक्तिगत स्तरावर नातेवाईकांकडून मदत घेऊन संस्था चालवली आहे.
आर्थिक बळाशिवाय संस्थेची गुजराण आणि मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे संस्थेला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर आणि संवेदनशील व्यक्तींनी संस्थेला अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य, आर्थिक सहकार्यासह अन्य प्रकारची मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे संस्थेला विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील शैक्षणिक साहित्य, रेकॉर्डिंग साहित्य आणि अन्य साहित्य खरेदी करता येणार आहे. यातून मुलांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
प्रकाशलाय संस्थेच्या या अंध विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळवले यश –
करण अंबाड – 68 टक्के
ऋषिदास शिंदे – 62 टक्के

अथांग भंडारे – 60 टक्के
रोहित दरेकर – 59 टक्के
अमोल वायदंडे – 57 टक्के
प्रकाश माळी – 53 टक्के
निशांत गरुड – 52 टक्के
प्रज्ञाचक्षूंना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी –
बँक – बँक ऑफ बडोदा
नाव – ऊर्जा प्रतिष्ठान
खाते क्रमांक – 39520100007646
आयएफएससी नंबर – BARB0BHOSAR (Fifth Character is Zero)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.