Eknath Shinde Profile : रिक्षाचालक ते मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांचा नेत्रदीपक जीवनप्रवास

एमपीसी न्यूज – रिक्षाचालक, नगरसेवक, मंत्री आणि आता चक्क मुख्यमंत्री… हा विस्मयकारक जीवन प्रवास (Eknath Shinde Profile) आहे, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा! 

संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासमवेत राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Profile) गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. पोट भरण्यासाठी प्रारंभी रिक्षा चालविणारा शिवसैनिक आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे.

Big Breaking News: एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी

वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव – एकनाथ संभाजी शिंदे
जन्म : 6 मार्च 1964
जन्म ठिकाण : अहिर, तालुका- महाबळेश्वर, जिल्हा-सातारा.
शिक्षण : कला शाखा पदवीधर
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता. मुले : एक मुलगा
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य. पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 147 -कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा-ठाणे.
भाजपच्या संजय घाडीगावकर  89  हजार 300 मतांनी हरवून विजयी

Eknath Shinde Press Conference: फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

ठाणे महापालिकेत 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता
विधानसभेवर 2004, 2009, 2014 व 2019 सलग चार वेळा आमदार
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते
12 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्षनेते
5 डिसेंबर 2014 ते नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री;

जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते;
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

ठाण्याच्या नामवंत वागळे इस्टेटमध्ये एका माशांचा कंपनीत त्यांनी सुपरव्हायझर म्हणून कामाला सुरूवात केली. काही काळाने नोकरी सोडून स्वयंरोजगाराचा पर्याय त्यांनी निवडला. ते ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. त्याच काळात एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे  नवे वळण मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.  वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. पक्षकार्यात स्वतःला झोकून देत शिंदे यांनी आनंद दिघे यांचा विश्वास संपादन केला.

पुढे एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची पक्षनिष्ठा पाहून वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच 1984 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याच्या किसननगरच्या शाखाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.