Pimpri : मेट्रोच्या कामगारांचे पुन्हा वेतनासाठी उपोषण 

महामेट्रो, जिल्हाधिकारी यांच्याकडे कामगारांनी मागितली दाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या काम करत असलेल्या कंत्राटदाराने कामगारांचे पुन्हा वेतन थकविले आहे. वेतन मिळावे यासाठी कामगार आज (शनिवार)पासून उपोषणाला बसले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यात दुस-यांदा वेतन मिळावे म्हणून कामगारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी महामेट्रो, जिल्हाधिकारी यांच्याकडे कामगारांनी दाद मागितली आहे.

पिंपरी, वल्लभनगर येथील कंपनीच्या आवारात कामगारांनी उपोषण (दि. 1) सुरू केले आहे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि. या कंपनीकडून विविध विभागात शंभर कामगार काम करतात. या कामगारांचे डिसेंबर 2018 ते एप्रिल या पाच महिन्यांचे वेतन थकविले होते. एप्रिलमध्ये या कामगारांनी काम बंद करीत उपोषणाचे हत्यार उपसले होते. स्टेशनचे कामही ठप्प झाले आणि त्यांनतर हा प्रकार उघडकीस आला होता.
त्यांनतर महामेट्रोने यामध्ये दुवा साधत कामगारांचे वेतन तातडीने देण्याची सूचना केली.

टप्प्याटप्प्याने हे वेतन दिले जाईल असे आश्वासन कामगारांना देण्यात आले होते. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. कामगारांना पाच महिन्याच्या वेतनापोटी काही रक्कम देण्यात आली. मात्र, पुन्हा उर्वरित वेतन थकविले. त्यामुळे 18 मे रोजी कामगारांनी थकीत वेतन देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून, गेल्या तीन महिन्यात दुस-यांदा वेतन मिळावे म्हणून कामगारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘कामगारांकडून काम करून घेतले जाते; मात्र त्यांचा मोबदला वेळेत दिला जात नाही ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. कामगारांना तातडीने त्यांचे वेतन द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन सुरू केले जाईल’ असा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.