Technology News : आदेशाचे पालन करा, नाहीतर ट्विटरवर कारवाई करू!

एमपीसी न्यूज : सरकारी आदेशाचे पालन करा, नाहीतर ट्विटरवर कारवाई करू असा सज्जड इशारा देणारी नोटीस भारत सरकारने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला बजावली आहे. एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने सरकारी आदेशाचे परस्पर उल्लंघन केले. या प्रकरणी भारत सरकारने ठाम भूमिका घेत ट्विटरला एक खरमरीत पत्र पाठवले आहे. 

सरकारी आदेशाचे पालन करत जो मजकूर ट्विटरवरुन काढून टाकण्यास सांगितले आहे तो मजकूर ताबडतोब हटवावा. परस्पर लवादाच्या भूमिकेत शिरुन निवाडा करण्याचा प्रयत्न करू नये. ट्विटर हे एक माध्यम आहे. सरकारी आदेशाचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर केली तर ट्विटरवर कारवाई करावी लागले, असे भारत सरकारने बजावले.

भारत सरकारच्या बदनामीसाठी ३० जानेवारी २०२१ रोजी हॅशटॅग मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेशी संबंधित सर्व मजकूर ट्विटरवरुन पूर्णपणे हटवावा, अशा स्वरुपाची नोटीस केंद्र सरकारने ट्विटरला बजावली होती. या नोटीसचे पालन करत ट्विटरने काही काळासाठी हा मजकूर हटवला. मात्र आता तो मजकूर पुन्हा दिसत आहे.

ठराविक दिवसांत विशिष्ट ट्वीटविषयी आक्षेप घेणाऱ्यांनी त्यांची भूमिका आमच्याकडे सादर करावी. आक्षेप योग्य वाटल्यास संबंधित ट्वीट कायमचे हटवले जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या या भूमिकेवर आक्षेप घेत भारत सरकारने ट्विटरला इशारा देणारे पत्र पाठवले आहे. लवादाच्या भूमिकेत शिरुन निवाडा करण्याचा प्रयत्न करू नका. सरकारी आदेशाचे पालन करा, असे भारत सरकारने ट्विटरला बजावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.