Pimpri : सुरक्षित वाहतुकीसाठी, स्मार्ट सिग्नल

एमपीसी न्यूज – वाहतूक व्यवस्था सुरक्षित व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच पादचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सिग्नलमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ रंगीत लाईटच्या मदतीने सिग्नल दिले जायचे. आता सिग्नलमध्ये अलार्म व्यवस्था बसविण्यात आली आहे. पादचा-यांना रस्ता ओलांडताना या अलार्म व्यवस्थेचा उपयोग होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये सध्या ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. पुढील काळात शहरातील सर्व सिग्नलवर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. ही सुविधा सुरु केल्याने पादचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळणार आहे. अलार्म वाजल्यामुळे वाहने थांबतील, तसेच पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यास मदत होत आहे.

पायी रस्ता ओलांडत असताना अपघाताचा मोठा धोका असतो. त्यामुळे सिग्नल असलेल्या चौकातून झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र, अनेक वाहन चालक झेब्रा क्रॉसिंगवर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे पादचा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी अडचणी येतात. प्रसंगी अपघातही होतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने सिग्नलवर पादचा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी अलार्म बसवण्यात आले आहेत.

सिग्नलवर ठराविक कालावधीनंतर पादचा-यांसाठी काही वेळ सिग्नल दिला जातो. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबल्यामुळे पादचा-यांना सिग्नल दिसत नाही. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी अनेक अडथळे येतात. त्यावर मात करण्यासाठी या सिग्नलला अलार्म बसविण्यात आला आहे. हा अलार्म पादचारी सिग्नल सुरु झाल्यावर सुरु होतो. सुरुवातीला ठराविक आवाज येतो. तसेच वेळ संपत आल्यावर देखील विशिष्ट आवाज येतो. त्यामुळे पादचारी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था उत्तम आहे.

वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये अशाच प्रकारे वाहतुकीबाबतच्या सूचना देण्यासाठी देखील यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे एखाद्या चौकात अथवा मार्गावरील वाहतुकीत बदल करणे, इतर सूचना प्रसारित करणे पोलिसांना सोयीचे जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like