Bhosari Crime News : ‘डीटीडीसी’ कुरीअरमार्फत मागविलेल्या 97 तलवारी 2 कुकरी जप्त

एमपीसी न्यूज – ‘डीटीडीसी’ कुरीअरमार्फत मागविलेल्या 97 तलवारी 2 कुकरी आणि 9 म्यान दिघी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पंजाब मधून औरंगाबाद आणि अहमदनगर येथील दोन इसमांनी मागवल्या होत्या. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ही माहिती दिली.

उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद, महाराष्ट्र), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब) आणि आकाश पाटील (रा. राहता, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे ‘डीटीडीसी’ कंपनीत 30 मार्च 2022 रोजी अवैध तलवार साठा आढळून आला होता. ‘डीटीडीसी’ कुरीअर कंपनीचे गोडाऊन दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्या दृष्टीने दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी गोडाऊनमध्ये मालाची एक्सरे मशीन द्वारे स्कॅनिंग करण्याची सूचना केली. 01 एप्रिल रोजी गोडाऊन मध्ये दोन लाकडी बॉक्सचे पार्सल आले यामध्ये 92 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केले आहेत.

तसेच, 03 एप्रिल रोजी आणखी एक बॉक्स आले. यामध्ये पंधरा हजार रुपये किंमतीच्या 05 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. असे दिघी पोलिसांनी एकूण 3 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीसनिरीक्षक दिलीप शिंदे, पोलीसनिरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोहवा अमोल जाधव, पोशि शेखर शिंदे, पोशि घुगरे व चालक पोना हेमंत डुंबरे यांनी केली आहे. पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.