इमारतीच्या डक्टमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे, एमपीसी न्यूज  – पुण्यातील खडकवासला परिसरातील एका इमारतीच्या डक्टमध्ये 16 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिंतामणी हाइट्स सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला. हिना शब्बीर पठाण असं मयत मुलीचे नाव आहे. मागील पाच दिवसांपासून ती बेपत्ता होती. हवेली पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चिंतामणी हाइट्स सोसायटीतील रहिवाशांना दुर्गंधी येत होती. सोसायटीतील एका रहिवाशाने खाली डोकावून पाहिले असता त्यांना इमारतीच्या डकमध्ये मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह संपूर्ण सडलेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मात्र चौकशी केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली.
हिना शब्बीर पठाण ही मुलगी त्याच इमारतीत राहत होती. मागील पाच दिवसांपासून ती बेपत्ता होती.. तिच्या आईने 29 मार्च रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान ससून रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. वरून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. हवेली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.