Talegaon : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीच्या बहाण्याने एका व्यक्तीची तीन कोटी 27 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन 2018 ते 30 मे 2023 या कालावधीत तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे घडला.

Chakan : कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

केदार विश्वनाथ शेलार (वय 41, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, मनीष रघुनाथ झेंडे, प्रवीण रघुनाथ झेंडे, सूर्यकांत मच्छिंद्रनाथ झेंडे, चेतन बापूराव झेंडे, विशाल झेंडे (सर्व रा. देहूगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना विश्वासात घेऊन तळेगाव दाभाडे येथील एका जमिनीचे जागेचे टायटल क्लियर नसतानाही फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या इराद्याने टायटल क्लियर असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना कर्ज नोंद नसलेला खोटा बनावट सातबारा दाखवला. खरेदी खतातही कर्ज बोजा नमूद न करता फिर्यादी यांच्याकडून प्लॉटच्या खरेदीपोटी 37 लाख 50 हजार रुपये घेतले.

तसेच अन्य 25 प्लॉट धारकांकडून दोन कोटी 90 लाख 27 हजार रुपये असे एकूण तीन कोटी 27 लाख 77 हजार रुपये घेतले. त्यानंतर प्लॉट धारकांच्या नावाची सातबारा दप्तरी नोंद न करता सर्वांचा विश्वासघात आणि फसवणूक केली. फिर्यादी यांनी याबाबत पाठपुरावा केला असता त्यांना तसेच अन्य तिघांना घर पाडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.