PHOTOS: गौराई आल्यात सोन्याच्या पायी…

मात्र या प्रत्येक ठिकाणी ही गौर म्हणजे माहेरवाशिणच असते. तिचा आजचा दिवस हा पूजेचाच असतो आणि आज माहेरवाशिण गौर तृप्त झाली की पुढे वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदती राहिल हा प्रत्येकाला विश्वास असतो.

एमपीसी न्यूज – ‘चल ग सये चल चल बाई, गौराई आल्यात सोन्याच्या पायी’ असे म्हणत वर्षातून एकदाच येणा-या गौराईचे आज घराघरात आगमन झाले आहे. या माहेरवाशिणीचे मनोभावे स्वागत करण्यासाठी, तिला नटवून सजवून, खाऊन पिऊन तृप्त करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरु आहे. ज्येष्ठागौरी आणि कनिष्ठागौरी गणपतीबाप्पासमवेत आज मखरात विराजमान झाल्या आहेत. नवनवीन साजश्रृंगार लेऊन, जरतारी साड्या नेसून त्या नखशिखांत सजल्या आहेत. आता दुपारी त्यांना चवीपरीचे नानाविध प्रकारचे भोजन देखील अर्पण केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतामध्ये गौराईंचे स्वरुप वेगवेगळे असते. काही ठिकाणी त्या उभ्याच्या मुखवट्यांच्या असतात. काही ठिकाणी खड्यांच्या स्वरुपात असतात. काही ठिकाणी त्या निसर्गाशी नाते सांगणा-या तेरड्याच्या रुपात असतात. तर काही तुरळक ठिकाणी मातीच्या मुखवट्यांच्या देखील असतात.

मात्र या प्रत्येक ठिकाणी ही गौर म्हणजे माहेरवाशिणच असते. तिचा आजचा दिवस हा पूजेचाच असतो आणि आज माहेरवाशिण गौर तृप्त झाली की पुढे वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदती राहिल हा प्रत्येकाला विश्वास असतो.

पेणला गणपतीच्या मूर्ती तयार करण्याची सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा आहे. तेथे गणपतीबरोबर गौरीचे मुखवटे देखील तयार केले जातात. पेणचे आद्य मूर्तीकार म्हणजे दिवंगत राजाभाऊ देवधर हे होत. सध्या त्यांचे सुपुत्र आनंद देवधर त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.

आनंद यांनी कलेचेच शिक्षण घेतले असून ते स्वत: विविध प्रकारच्या इतर मूर्ती देखील साकारतात. त्यांनी घडवलेल्या अनेक मूर्ती देशाच्या विविध भागात स्थापित आहेत. काही वर्षांपूर्वी आनंद यांनी अत्यंत बोलके असे गौरीचे मुखवटे तयार केले होते.

मूर्तीकाराचे खरे कसब त्याने साकारलेल्या मूर्तीमध्ये दिसते. स्त्री सौंदर्याचे मानबिंदू ठरतील असे हे देखणे मुखवटे पाहताक्षणी नक्कीच आपले मन वेधून घेतील असेच आहेत. त्यानंतर त्या मुखवट्यांना पुणे येथील सुवर्णकार अमोल कायगावकर यांनी अत्यंत कुशलतेने नटवले, सजवले.

आनंद देवधर यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘जणू काही पेणच्या खेडवळ मुलींना पुण्याला आणून अमोल यांनी रॅम्पवर चालायला लावले’. एका कलाकाराने घडवलेल्या या गौरींना दुस-या कलाकाराने जणूकाही समर्पक अशी दादच दिली. नखशिखांत दागिन्यांनी सजलेल्या गौराईंचे आज गौरीपूजनाच्या दिवशी झालेले प्रसन्न दर्शन नक्कीच मनमोहक असेच आहे.

खास एमपीसी न्यूजच्या वाचकांसाठी या गौराईंची एक देखणी झलक…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.