Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; घरातील गणेश मूर्ती किती उंचीची असावी ?

घरामध्ये एका वेळेस दोन मूर्तींची स्थापना करण्याची काहीच आवश्यकता नाही. एका घरामध्ये पूजेत एकच मूर्ती असावी.

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. घरी गणेशाची स्थापना करताना गणेशमूर्ती लहानच असली पाहिजे, याबाबतीतचे काही नियम आहेत काय ?

– घरातील गणेशाची मूर्ती साधारण वीतभर उंचीची असावी असा संकेत आहे. गणेशाची मूर्ती केवढी असावी असा कोणताही नियम नाही. मात्र पूजनाच्या दृष्टीने आणि 10 दिवस ती नीट राहावी यादृष्टीने काही काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एकवीत उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्यतो चिकणमाती, शाडूची असावी.

2. गणेशाची मूर्ती घरात स्थापन करताना काही जण एकावेळी दोन मूर्तींची स्थापना का करतात ?

– घरामध्ये एका वेळेस दोन मूर्तींची स्थापना करण्याची काहीच आवश्यकता नाही. एका घरामध्ये पूजेत एकच मूर्ती असावी.

3. गणपती दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, गौरी गणपती, अकरा दिवस असा विविध कालावधीसाठी बसवतात? यामागचं काय कारण? सगळे एकाच कालावधीचे का नसतात?

– मुळातील गणेश चतुर्थीचे व्रत हे 10 दिवसांचे नाही तर दीड दिवसांचेच आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हा चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरु केला. अनेकांनी आपापल्या आवडीनुसार, सोयीनुसार तीन दिवस, पाच दिवस असे पर्याय निवडले त्यामुळे त्यात विविधता दिसून येते.

4. गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचा शास्त्रोक्त प्रघात कधीपासून पडला?

– गणपतीचे अनेक अवतार मानले जातात त्यापैकी भाद्रपदातील गणेश चतुर्थीस पार्थिव गणेश पूजन सांगितले आहे. हा पूर्वापार सुरु असलेला प्रघात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.