Talegaon : अति जेवणामुळे अनाथ आश्रमातील दहा मुली रुग्णालयात

एमपीसी न्यूज – जेवण अति झाल्यामुळे तळेगाव मधील रेनबो अनाथ आश्रमातील दहा मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव मधील काडोलकर कॉलनी मध्ये रेनबो अनाथ आश्रम आहे. अनाथ आश्रमात दहीहंडीच्या सणानिमित्त विशेष जेवण बनविण्यात आले होते. आश्रमातील विद्यार्थ्यांनी या जेवणावर यथेच्छ ताव मारला. जेवण झाल्यानंतर सर्व मुली झोपी गेल्या. रात्री बाराच्या सुमारास अचानक दहा मुलींच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे अनाथ आश्रमातील कर्मचा-यांनी मुलींना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले.

दाखल करण्यात आलेल्या सर्व मुलींवर रात्री उपचार करण्यात आले. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याची शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात आली. मात्र वैद्यकीय उपचारानंतर हा प्रकार विषबाधेतून झाला नसून अति जेवणामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. रात्री उपचारानंतर सकाळी 7 मुलींना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर उर्वरित मुलींना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.