Good Health Tips : लहान मुलांना जन्मजात येणाऱ्या व्यंगांचे समज – गैरसमज

एमपीसी न्यूज (डाॅ. राजीव निरवणे) – मूल जन्माला येते तेव्हा घरात एकदम आनंदाचे वातावरण असते. परंतू त्याच्यातील जन्मजात व्यंग लक्षात आल्यावर तणावाचे वातावरण निर्माण होते. परंतू अशावेळी गडबडून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार केल्यास ते मूल नक्कीच सामान्य जीवन जगू शकते. आजच्या सदरात जाणून घेऊ लहान मुलांना जन्मजात येणारे व्यंग, त्यावर असणाऱ्या गैरसमजूती, व्यंग येण्याची कारणे, त्यावरील निदान! 

क्लबफूट – पायातील जन्मजात व्यंग

विविध बाल अस्थिव्यंगापैकी मुख्यत: आढळणारा प्रकार म्हणजे क्लबफूट (100 जन्मांपैकी 1 ते 2 ) 30-50% बालकांमध्ये दोन्ही पायांस हा आजार असू शकतो. मुलींपेक्षा मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. (2:1) यामध्ये बाळाचे पाय जन्मत:च घोट्यापासून वाकलेले असतात. पायाचा पंजा आतल्या दिशेने वळलेला असतो. घोट्याच्या मागचा स्नायू आखूड असतो. टाच जमिनीवर टेकत नाही. पोटरीचा स्नायू लहान असू शकतो.

कारणे –

  • बाळाची गर्भाशयातील स्थिती- गर्भाशयात बाळ अधिक काळ त्या स्थितीत असल्यास पाय वाकडे राहतात.
  • नसांचा वा स्नायूंचा आजार – जन्मतः नसांची कमजोरी अथवा स्नायूंचा ताठपणा.
  • मणक्यांचे काही आजार – Meningomyelocele (MMC)
  • त्वचा व स्नायू यांच्यामध्ये लवचिकतेचा अभाव (AMC)

निदान – 

हा आजार जन्मत: असल्यामुळे त्वरीत दिसून येतो. परंतू साधारणत: 10 ते 15% बाळांमध्ये खुब्याचा किंवा गुडघ्याचा सांधा निखळलेला असू शकतो तसेच वरील प्रकारच्या इतर व्याधीसुद्धा निदान करणे तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच बाल अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे बहुमोलाचे ठरते.

उपचारांविषयीच्या गैरसमजूती – 

  • एकदा वाकडे असलेले पाय शस्त्रक्रियेशिवाय सरळ होऊच शकत नाहीत.
  • प्लास्टरने पायांचे वाढ थांबते व पाय बारीक होतात.
  • उपचारांची सुरुवात बाळ मोठे झाल्यावर करावी.
  • 2-3 वेळा प्लास्टर करून पाय सरळ होतो. त्यानंतर चालताना विशिष्ट बूट वापरावे लागतात.

परिणामकारक उपचारपद्धती –

जेवढ्या लवकर उपचार सुरु केले जातात तेवढ्याच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून पाय संपूर्णत: सरळ होऊ शकतात. ते सुद्धा कुठल्याही प्रकारचा टाका न घालता! डॉ. पॉमेन्टी यांनी 65 वर्षांपासून अधिक काळ अभ्यास करून मांडलेली ही उपचार पद्धती जगात सर्वमान्य आहे. परंतू त्याविषयीच्या जागरुकतेचा प्रभाव सहसा दिसत नाही.
एका विशिष्ट प्रकारे या Talus हाडावर दाब देऊन पायाचा आत वळलेला पंजा हळूवारपणे बाहेर घेतला जातो, त्या
स्थितीमध्ये मांडीपर्यंत प्लास्टर केले जाते.

प्रत्येक आठवड्यात प्लास्टर काढून पंजा फिरवून नवीन प्लास्टर केले जाते. साधारणत: 3 ते 4 प्लास्टरनंतर पाय पूर्णत: बाहेरच्या बाजूस येतो. त्यानंतर घोट्याच्या मागचा आखूड स्नायू सोडवण्याची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली तो. त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. त्यानंतर येणारे प्लास्टर 3 आठवड्यानंतर काढून विशिष्ट प्रकारचे बूट जोड दिले जातात.

हे बूटजोड सुरुवातीचे 3 महिने 22 ते 23 तास घालावे लागतात. त्यानंतर हळूहळू हा कालावधी कमी केला जातो. रात्री झोपताना हे बूट वयाच्या 2 ते 4 वर्षापर्यंत वापरावे लागतात. जर या नियमानुसार बूटजोड वापरले नाही तर व्यंग पुन्हा उद्‌भवू शकते. उशिरा निदान झाल्यावर / अर्धवट उपचार मिळालेल्या मुलांसाठी टाक्याच्या शस्त्रक्रिया प्रचलित आहेत.

त्यामध्ये ब-याचदा काही दुष्परिणात होतात. उदा. व्याधी पूर्वपदावर येणे, व्रण तसेच सतत दुखणारा पाय, निष्णात बालअस्थिरोगतज्ज्ञ अगदी वयाच्या 3 ते 4 वर्षापर्यंतसुद्धा हीच पांन्मेटी पद्धत वापरतात. त्यामुळे सर होणारे पाय हे अगदी लवचिक व वेदनारहीत राहतात.

पॉमेन्टी पद्धतीमध्ये स्प्लिटसचा योग्य रित्यावापर हा अत्यावश्यक असतो. कोवळ्या वयातच उपचार केल्यास लागणाऱ्या प्लास्टरची संख्या व कालावधी कमी असतो तसेच त्या मुलांना स्प्लिट्‌स वापरण्याची सवय चांगल्या प्रकारे होते. म्हणूनच क्लबफूटचे निदान झाल्यानंतर लवकरात लवकर बालअस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावरी उपचार त्वरीत सुरु करावे.

–  डाॅ. राजीव निरवणे (लेखक बालअस्थिरोग तज्ज्ञ (एम.एस.) आहेत)

याविषयी आणखी जाणून घ्यायचे असल्यास खालील वेबसाईटवर नक्की भेट द्या.

https://www.pediatricorthopedicdoctor.in/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.