Pimpri: कोरोनाचा कहर, मात्र पालकमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ !

Guardian Minister ajit pawar did not come in Pimpri-Chinchwad after Coronavirus havoc

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र शहरात अद्यापर्यंत फिरकले देखील नाहीत. केवळ पुण्यात बैठक घेतात. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शहरात एकदाही न आलेल्या अजित पवार यांनी कोरोनाच्या काळातही शहराकडे पाठ फिरविणेच पसंत केले. त्यामुळे बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवडवर आपले अधिक प्रेम असल्याचे सांगणारे अजितदादा संकटाच्या काळात शहरात का येत नाहीत, असा सवाल आता शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर सलग 12 रुग्ण सापडले होते. एप्रिल महिन्यापासून शहरात दररोज रुग्ण सापडत आहे. मागील तीन दिवसांपासून तर दिवसाला 40 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाने आनंदनगर झोपडपट्टीला तर वेढा घातला आहे. या झोपडपट्टीत दीडशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा चारशेवर जाऊन पोहोचला आहे.

शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून तीन महिने होत आले. तथापि या तीन महिन्यांच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरात एकदाही आले नाहीत. प्रत्यक्ष शहरात येवून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला नाही. पिंपरी-चिंचवडकर अडचणीत असताना पंधरा वर्ष शहराचे कारभारी राहिलेल्या अजितदादांनी पाठ फिरविल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे.

अजित पवार शहरातील परिस्थितीचा महापालिका आयुक्तांकडून दैनंदिन आढावा घेत असतील. सूचनाही करत असतील. परंतु, शहरात मात्र फिरकले नाहीत. उपमुख्यमंत्री झाल्यापासून आणि कोरोनाच्या आपत्तीतही दादांनी शहरात न येणे पसंत केल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शरद पवार, अजितदादा दोघांचेही शहराकडे लक्ष
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा अजित पवार हे दररोज आढावा घेतात. आठवड्यातून एकदा जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतात. या बैठकीला पिंपरी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त उपस्थित असतात. अजितदादा आयुक्तांना वेळोवेळी सूचना देतात. त्यांचे शहराकडे बारीक लक्ष आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना राज्याच्या परिस्थितीवर देखील नियंत्रण ठेवावे लागत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची एकत्रित बैठक घेतात. तरी, देखील पिंपरी-चिंचवड शहरात एक बैठक घेण्याची विनंती आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील शहरातील परिस्थितीची माहिती घेतात. त्यांचेही शहराकडे लक्ष आहे, असे राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like