Gudipadva Special : गुढी उभारू समृद्ध जीवनाची – राजन वडके

एमपीसी न्यूज (राजन वडके) : यंदाचा गुढीपाडवा आपल्या सर्वांसाठी खासच म्हटला पाहिजे. गेल्या दोन वर्षांच्या मानसिक पडझडीनंतर आलेला हा चैत्र प्रतिपदेचा दिवस आपणां सर्वांच्या मनांत नवा अंकुर फुलवणारा आहे.

मागील दोन वर्षांच्या सर्वच क्षेत्रातील अंधकारमय जीवनाकडून नवीन आशेची किरणं आपल्याला खुणावत आहेत. ही जाणीव सुखावणारी आहे. शिशिरातील पानगळतीनंतर चैत्रात निसर्गातील सर्व झाडांना नवी पालवी फुटते. मानवी जीवनातील मागचा शिशिर फारच म्हणजे दोन वर्षे लांबला. त्यात शारीरिक, मानसिक प्रचंड पडझड झाली. अनेक जण शरीराने उन्मळून पडले तर राहिलेले मनाने खचून गेले होते. मात्र, कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची वृत्ती असलेल्या माणसांनी `त्या` विषाणूच्या शत्रूविरुद्ध यशस्वी लढा दिला. या काळातील  चैत्रात मनाला पालवी फुटलीच नव्हती. आता मात्र या यशस्वी लढ्याच्या अंतीम क्षणी जीवनाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

सामसूम झालेल्या रस्त्यांवर वर्दळ सुरू झाली आहे. दूध टाकणारा गवळी, पेपर टाकणारा पोऱ्याची त्याचबरोबर कंपनीत वेळेत पोचण्याची नोकरदार वर्गाची गडबड सुरू झाली आहे. कंपन्यांतील यंत्रांचा आवाज एमआयडीसी परिसराच्या जागेपणाची जाणीव देत आहे. अनेक आयटी कंपन्या पूर्ववत सुरू झाल्याने `वर्क फ्रॉम होम` मुळे कंटाळलेला आयटीयन्स जाम खूष आहे.

अनेक शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिक्षणाने कंटाळलेले व मित्रांना भेटण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आनंदाने वेळेवर रिक्षावाले काका किंवा आपल्या स्कूलबसची वाट पाहताना दिसताहेत. शाळांतील मैदाने या मुलांनी फुलल्याचे दृष्य आनंददायी आहे. घरात गुदमरलेल्या तरुणाईत उत्साह संचारल्याचे दृष्य शहरभर आहे. गप्पांचा कट्टा चहाचा आस्वाद घेत एकमेकांची टर उडवत हास्याचे फवारे उडवत पुन्हा उल्हासित करू लागला आहे.

पथारीवाल्यपासून मॉलपर्यंत सर्व ठिकाणी व्यवहार सुरू झाले आहेत. ओस पडलेल्या भाजी मंडईतीत भाजी विक्रेत्यांचा खणखणीत आवाज कानावर पडू लागला आहे. गर्दीतून स्वतःला जपत वाट काढत ताजी हिरवीगार भाजी खरेदी करताना महिलांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत आहे.

मॉर्निंग वॉकचा तजेला लोकांच्या चेहेऱ्यावर दिसू लागला आहे. जीम मध्ये व्यायाम करणाऱ्यांना घामाचा वास सुखावत आहे. सायंकाळी शहरातील उद्याने बहरू लागली आहेत. उद्यानांत लहानग्यांच्या आगमनामुळे खेळण्यांवरील धूळ उडून गेली आहे. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये गर्दी होऊ लागली आहे. मंगल कार्यालये, बँक्वेट्स् मधून सनईचे मंगलमय सूर कानावर पडू लागले आहेत.

माणसंच काय देवही मंदिरात गेली दोन वर्षे बंदिस्त होता. मंदिराची कुलपे उघडल्याने देवदेवतांचे तेजही काहीसे उजळल्याचा भास भक्तांना होतो आहे… एकूणच जगाचे रहाटगाडगं गेली दोन वर्षे थांबविणारा `तो` विषाणूच्या रूपातील शिशिर संपला आहे. वसंतोत्सव सुरू झाला आहे. पोपटी पालवीनं शृंगारलेले वृक्ष, पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेला बहावा आणि लालभडक फुलांच्या गुलमोहरची बरसात सुखावणारी आहे. पानोपानी पालवी आणि विविधरंगी फुलांचा बहर मनाला तजेला देणारा आहे. पुन्हा पुन्हा बहरण्याची निसर्गदत्त देणगी लाभल्यामुळे चैत्रातील सृष्टी ग्रीष्माची दाहकता शीतल करते. तसंच काहीसं मानवी जीवनाचं आहे. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करत पुन्हा उत्साहाने मार्गक्रमण करायचे असते.

तळपत्या उन्हातही आपल्या कोवळ्या लालसर पालवीची सळसळ ऐकवणाऱ्या पिंपळाच्या गर्द सावलीत काही क्षण विसावा घेताना थकवा दूर होतो. स्वप्नांना नवसंजीवनी देणाऱ्या या चैत्रातील पालवीच्या आणि विविधरंगी फुलांनी बहरलेल्या वृक्षांच्या साक्षीने सदाबहार असलेल्या कडुनिंबाच्या कडवट पानांचा प्रसाद चाखून मानवी जीवनातील शिशिरातील दुःखी व वाईट प्रसंगांची मरगळ झडकून नव्या जीवनाची गुढी उभारायची.

त्यामुळेच यंदाचा गुढीपाडवा हा आपल्या सर्वांसाठी खास आहे. गेल्या दोन वर्षांतील मानसिक ताणतणाव, दुःख, जे जे वाईट घडले ते तेथेच ठेवून आनंदी, आरोग्यदायी आणि समृद्ध जीवनासाठीची गुढी उभारून आपण सर्व जण पुढे जाऊयात.

सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!   

महाराष्ट्र निर्बंध मुक्त

हा लेख लिहित असतानाचं राज्याच्या मंत्रिमंडळाने गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय जाहीर केला. गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवणुका आणि शोभायात्रा काढण्यासही परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत आनंददायी आहे.

त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाचा आनंद द्विगुणीत झाला असून, आपल्या सर्वांचे दैनंदिन जीवन पुन्हा गती घेईल. मात्र, निष्काळजीपणा करून चालणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.