Pimpri : अधिक पैसे देण्याच्या आमिषाने ‘गुडविन’ कंपनीकडून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक? गुडविन दुकानात नागरिकांचा गोंधळ

एमपीसी न्यूज – महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीपर्यंत भरल्यास कालांतराने अधिक पैसे देण्याचे अमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. नागरिकांनी गुंतवलेले लाखो रुपये सराफी पेढी चालवणा-या ‘ गुडविन’  कंपनीने वेळेत परत केलेच नाहीत. पैसे देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने गुंतवणूकदार नागरिकांनी चिंचवड स्टेशन चौकातील गुडविन दुकानाला भेट दिली. त्यावेळी दुकानातील सर्व दागिने साफ झाल्याचे त्यांना पाहायला मिळाले. यामुळे आज (मंगळवारी) दिवसभर अनेक गुंतवणूकदार नागरिकांनी गुडविन दुकानात ठिय्या मांडला. दुकानात दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. नागरिकांनी दुकानातील कर्मचा-यांना दुकानातच रोखून धरले.

ज्योती अरविंद फाकटकर या महिलेने 50 हजार हजार रुपये या कंपनीत गुंतवले आहेत. त्यांना वेळेत पैसे परत न मिळल्याने त्या मंगळवारी दिवसभर दुकानात बसल्या.

ज्योती यांनी सांगितले की, “गुडविन कंपनीचे सुनील कुमार आणि सुधीर कुमार यांनी गुडविन कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक पैसे मिळणार असल्याचे सांगितले. इतर ठिकाणी सराफी पेढीत गुंतवणूक केल्यास जमा झालेल्या रकमेचे सोने घ्यावे लागते. मात्र, गुडविन कंपनीने जमा झालेल्या रकमेवर अधिक व्याज जोडून पैसे देणार असल्याचे सांगितले. इतर ठिकाणच्या योजनेपेक्षा ही योजना चांगली वाटल्याने पैशांची गुंतवणूक केली. ठरलेल्या मुदतीत पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीकडून वारंवार पैसे देण्यासाठी चालढकल करण्यात आली.

अनिता गालफाडे यांनी या कंपनीत 50 हजार रुपये गुंतवले आहेत. त्या म्हणाल्या, “इतर ठिकाणी सुवर्ण पेढीत पैसे गुंतवल्यास जमा झालेल्या पैशांचे सोनेच घ्यावे लागते. परंतु, गुडविनकडून 12 महिने पैसे भरल्यास एका महिन्याचे पैसे कंपनी भरणार आणि 13 महिन्यांचे पैसे गुंतवणूकदाराला मिळणार असल्याची योजना सांगितली. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवण्याची ही चांगली कल्पना वाटल्याने आम्ही इथे गुंतवणूक केली. मागील अनेक दिवसांपासून पैसे देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. आज दुकानात भेट दिली असता दुकानातील सर्व दागिने साफ झाल्याचे दिसत आहे.

नूरजहाँ शेख यांनी 30 हजार रुपये गुंतवले आहेत. शेख यांनी सांगितले की, “कंपनीच्या ब्राउचरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अन्य बड्या मंडळींसोबतचे फोटो देण्यात आले आहेत. यामुळे आम्ही यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले आहेत. गुडविनच्या पुण्यातील अन्य शाखांमध्ये देखील हीच स्थिती असल्याचे समजत आहे.

यासोबतच अनिता कांबळे (1 लाख रुपये), शैला हुले (1 लाख रुपये), अरुणा चौधरी (54 हजार रुपये), संतोषी झिंजुर्डे (37 हजार 500 रुपये), सुनीता जाधव (35 हजार रुपये), श्रद्धा नांगळे (37 हजार 500 रुपये), सिस्टमा मिसाळ (25 हजार रुपये), अॅनी डेविस, शालन तिकोने आणि अन्य अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये गुंतवले आहेत.

या सर्वांनी चिंचवड येथील दुकानात दिवसभर ठिय्या मांडला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार यांनी रात्री आठ वाजता येऊन सर्वांचे पैसे देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी दुकानात गर्दी केली. निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कंपनी व्यवस्थापनाशी चारचा करून गुन्हा दाखल करणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. रात्री आठ पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.