BNR-HDR-TOP-Mobile

Pune: तापमानाचा नवा उच्चांक, पारा 42.9 अंशांवर!

एमपीसी न्यूज – शहरातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच असून शहरात आज 42.9 अंश सेल्सियस या विक्रमी तापमानाची नोंद झाली. काल शहरात 36 वर्षांतील सर्वांत जास्त तापमानाची नोंद झाली होती. तो उच्चांक आज मोडला गेला.

पुणेकरांनी काल गेल्या 36 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस अनुभवला होता. शहरात काल 42.6 अंश सेल्सियस इतक्या या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात कमान तापमान 40-41 अंशांच्या आसपास राहिले आहे. अजून तीन दिवस तरी उष्णतेची ही लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला होता.

आज वाढत्या तापमानामुळे पारा 42.9 अंश सेल्सिअसवर गेला. वाढत्या तापमानामुळे पुणेकर व पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत. दुचाकीस्वार या रणरणत्या उन्हापासून बचाव करण्याकरीता उपरणे, टोप्या, डोक्यावर घेऊन प्रवास करीत आहेत. बाजारात सकाळी दहा वाजताच उन्हाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवत होत्या. शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेकजण ऊसाचा रस तसेच थंडगार ज्युस, लस्सी व अन्य शीतपेये घेणे पसंद करीत असल्याचे आढळत होते. तसेच ताक, मठ्ठा विक्रीत वाढ झाली असून ऊस रसवंती केंद्रांवर तुफान गर्दी पाहायला मिळत होती. शिवाय टरबूज खरेदीवर अनेकांचा विशेष कल होता.

उकाडा सहन करता यावा यासाठी एसी, कुलर, पंख्यांचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. तर शीतपेयांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून टोपी, गॉगल, सनकोटचा वापर करणे पसंद केले आहे.तर, रणरणत्या उन्हामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत रस्त्यावर गर्दी तुरळक होताना दिसत आहे. दरम्यान, कडक उन्हामुळे परिसरातील रस्त्यासह विविध दुकानात आता टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हातमोजे विक्रीसाठी आले असून हे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.