Hinjawadi : महिला वाहतूक पोलिसाला कार चालकाची शिवीगाळ

एमपीसी न्यूज – रस्त्यामध्ये कार थांबवल्याबाबत महिला वाहतूक पोलिसांनी चालकाला कार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून चिडलेल्या कार चालकाने गाववाला असल्याचे सांगत वाहतूक पोलीस महिलेशी अश्लील शिवीगाळ करून भर रस्त्यात हुज्जत घातली. हा प्रकार सोमवारी (दि. 1) हिंजवडी वाकड रोडवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

याप्रकरणी 50 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर निवृत्ती शितोळे (वय 32, रा. काकडे कॉलनी, आदर्श नगर, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वाहतूक पोलीस हिंजवडी वाकड रस्त्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या पंक्चर जवळ वाहतूक नियंत्रणाचे काम करत होत्या. त्यावेळी सागर त्याच्या स्कोडा कार (एम एच 14 / जी एन 0090) मधून हिंजवडी वाकड रस्त्यावरून जात होता. त्याने पेट्रोल पंपासमोरील पंक्चर समोर कार थांबवली. यावेळी रस्त्यावर वाहने जास्त असल्याने एखादे वाहन रस्त्यात थांबल्यास त्याचा परिणाम वाहतूक कोंडीस होतो. त्यामुळे कर्तव्य बजावत असलेल्या फिर्यादी यांनी सागरला कार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले.

यावर चिडलेल्या सागरने ‘तू इथे पॉईंटला आहेस का? तुझी नोकरी तू कर. मी गाववाला आहे. मी आमदाराला फोन लावतो आणि मी कोण आहे ते दाखवतो’ असे म्हणून त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा संपूर्ण प्रकार भर रस्त्यात झाला. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत आणि मोटार वाहन कायद्यान्वये सागर याच्यावर गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.