Hinjawadi News : हिंजवडी, निगडी आणि चिखलीमध्ये चोरीच्या चार घटना

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर निगडी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये तीन लाख 18 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

प्रेमानंद गोपाळ बारसकर (वय 42, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी – कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 60 हजार 400 रुपयांचे सोन्या – चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. ही घटना २१ ते २९ मे या कालावधीत घडली.

बबन भगवान सोनवणे (वय 34, रा. पिंपळे गुरव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बावधन येथे पुराणिक बिडकॉन प्रा ली कंपनीचे ऑफिस आहे. 28 मे रोजी रात्री साडेआठ ते 29 मे रोजी सकाळी दहाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने पेंटरच्या शिडीच्या साहाय्याने फिर्यादी यांच्या ऑफिसच्या टेरेसवर चढून आत प्रवेश केला. ऑफिसमधून चोरट्याने 77 हजार रुपये किमतीचे 12 लॅपटॉप चोरून नेले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

संदीप तुकाराम पाटील (वय 42, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास दिगंबर पांचाळ (वय 27, रा. इकळीमोर नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे निगडी येथे हॉटेल आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या हॉटेलमधील युपीआय आयडीचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून ऑनलाईन व्यवहार करत फिर्यादी यांच्या खात्यातून एक लाख 800 रुपयांची चोरी केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

सतीश सागर दराडे (वय 33, रा. रांजणगाव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कुदळवाडी येथून दुचाकीवरून जात होते. मौर्या हॉटेलजवळ असलेल्या झाडाखाली त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली आणि हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. नाश्ता  येईपर्यंत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची 80 हजारांची दुचाकी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.