Hinjawadi: हिंजवडीतून ट्रॅक्टर चोरणारी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील टोळी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Hinjawadi: Tractor thief from Hinjawadi in Solapur, Osmanabad district gang caught in Pimpri-Chinchwad crime branch आरोपी राहुल आणि तुषार हे उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध हाणामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून ट्रॅक्टर चोरणा-या चार जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असून त्यातील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

सागर कुमार हवाळे (वय 19, रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), करण तानाजी वायकर (रा. पिंपरी (पा), पोस्ट, साकत, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), राहुल म्हसू शिंदे (रा. ता. परांडा, जि. उस्मानाबाद), गोकुळ धोंडीराम पवार (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे. मूळ रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथील बोडकेवाडी येथून तीन लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती.

याबाबत 16 जून रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस करीत होते.

पोलीस नाईक वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात चोरीला गेलेला ट्रॅक्टर हिंजवडीकडून हडपसरच्या दिशेने गेल्याचे समजले. तसेच चोरी करताना आरोपींनी वापरलेल्या मोटारसायकलची माहिती काढून पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा शहर गाठले.

परांडा तालुक्यातील लोणी गावातील एका तरुणाची दुचाकी गुन्ह्यात वापरण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवस उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील परिसरात सापळा रचून आरोपी सागरला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार करण, राहुल, तुषार आणि अन्य दोन मित्रांसोबत मिळून गेल्याचे सांगितले.

सागरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्याचे अन्य साथीदार पसार झाले. पोलिसांनी आरोपी करणला बार्शी तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेतले.

आरोपी करण हा एका गावातील शेतात लपून बसला होता. त्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार राहुलला चिंचवड येथून ताब्यात घेतले. तिघांकडे चौकशी केली असता आरोपींनी चोरलेला ट्रॅक्टर भेकराईनगर, फुरसुंगी येथील त्यांचा मित्र गोकुळ याला 60 हजार रुपयांना विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी गोकुळलाही ताब्यात घेतले. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी राहुल आणि तुषार हे उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध हाणामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, संतोष असवले, वासुदेव मुंडे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, तुषार शेटे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.