Pune News : भारतातील तिसरा उलूक उत्सव पिंगोरी येथे होणार 

एमपीसी न्यूज : इला फाऊंडेशन, पुणे, या संस्थेच्या वतीने “इला हॅबिटॅट”, पिंगोरी, (तालुका पुरंदर; जिल्हा पुणे) येथे उलूक उत्सव आयोजित केला जाणार आहे. (Pune News) घुबडांच्या बाबत जनजागृती करणारा भारतातील हा असा एकमेव उत्सव आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे.

या उलूक उत्सवामध्ये घुबड हा मानवासह शेतकऱ्याचा मित्र आहे.घुबडांबद्दल समाजात मोठया अंधश्रध्दा व चुकीचे समज आहेत. घुबडांच्या भारतात एकूण 42 प्रजाती आढळत असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने उलूक उत्सवाचे आयोजन केले आहे.

उलूक उत्सवातील वैशिष्ट्य 

1 व 2 डिसेंबर ला पिंगोरी येथे होणाऱ्या उलूक उत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्व समजण्यासाठी घुबडांच्या 3000 च्या आसपास चित्रे, विविध कलाकृती, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेंदी काम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. घुबड – नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रिजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन ,लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडांची जीवनप्रणाली स्पष्ट केली जाणार आहे.

या उलूक उत्सवासाठी जवळ जवळ 70 शाळा , काही महाविद्यालये आणि विविध निसर्गप्रेमी संस्था यांनी सहभाग घेतलेला आहे.

 जागतिक पातळीवर उलूक उत्सवाची दखल 

फाऊंडेशन च्या वतीने 2018 ला आयोजन केलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. तर 2019 मधील उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली जाऊन, बावीस देशांमधील संशोधक पिंगोरी येथे या उत्सवास भेट द्यायला आले, ही आपल्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे, अशी माहिती इला फाउंडेशनच्या ट्रस्टी सुरुची पांडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.