Pune News : जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद आवारात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

 

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने बचत गटातील महिला भगिनींनी ध्वज विक्री उपक्रम सुरू केला आहे.नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.

 

आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत स्तरावरही ग्रामपंचायत तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंत्योदय तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याला ध्वज मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.गावागावात जनजागृतीही सुरू आहे. ध्वजांची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू होत आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आवारात शिंदवणे ता.हवेली येथील अन्नपूर्णा महिला ग्राम संघाच्यावतीने ध्वज विक्री सुरू आहे.सुरुवातीला 1500 ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.