IND vs Bangladesh : बांगलादेशला पाच धावांनी पराभूत करत भारताने मिळवला चित्तथरारक विजय

एमपीसी न्यूज – (विवेक कुलकर्णी) उपांत्यफेरीतली आपली जागा पक्की करण्यासाठी विजयाची तीव्र गरज असलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचा (IND vs Bangladesh) पाच धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतले आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. या विजयासह भारत पुन्हा एकदा आपल्या गटात प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ऍडीलेडच्या मैदानावर झालेल्या विश्व कप 2022 मधल्या एकूण 35 व्या आणि भारतीय संघाच्या चौथ्या सामन्यात आज नाणेफेकीचा कौल रोहीतच्या विरोधात गेला,पण बांगलादेशचा कर्णधार शकीबुल हुसेनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले.भारतीय संघात आज कोणताही बदल झाला नाही. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात आजही खराब झाली.कर्णधार रोहीत आजही फारसे योगदान न देता केवळ 2 धावा करुन हसन मेहमूदच्या गोलंदाजीवर तंबूत परतला अन भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला.

रोहीतच्या जागी खेळायला आला तो जबरदस्त लयीत आलेला विक्रमवीर विराट कोहली. के एल राहुलला या विश्वकप स्पर्धेत आतापर्यंत तरी काही खास कामगिरी करून दाखवता आली नव्हती, साहजिकच त्याच्यावर प्रंचड दडपण होते पण असे नेहमीच म्हटले जाते की उत्तम खेळाडू आपला सर्वोत्कृष्ट खेळ दडपणाखालीच दाखवतो. के एल राहुलने सुद्धा ही म्हण खरी करुन दाखवताना जबरदस्त खेळ करत टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आणि रोहीतच्या विकेटच्या पतनानंतर आलेले दडपण ही कमी करुन दाखवले.(IND vs Bangladesh) राहुलला खूप उज्ज्वल भविष्य आहे हे नेहमीच म्हटले जाते ते का हे त्याने आज सप्रमाण सिध्द करून दाखवले. त्याने मैदानाच्या चारी बाजूला फटके मारत आपले एकूण वे 21 आणि वर्ल्डकपमधले 4 थे अर्धशतक पूर्ण केले.त्याने केवळ 32 चेंडूत 3 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि विराटसोबत दुसऱ्या गड्यासाठी  67 धावांची वेगवान भागीदारीही केली.

 

PCMC News : शासनाचा एक ‘जीआर’ अन् आयुक्तांकडून ठेकेदारांना 48 कोटींचा ‘स्पेशल रिलीफ’

मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच तो एक खराब फटका मारुन शकीबच्या गोलंदाजीवर मुस्तफिजूरच्या हातात झेल देवून बाद झाला.त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवने आपल्या चिरपरिचित शैलीत धुवांधार फलंदाजी करत आपल्या उत्तम फॉर्मला चालूच ठेवले. ही जोडी जमली आहे असे वाटत असतानाच सुर्यकुमार यादव शकीबच्या गोलंदाजीवर 30 धावांवर असताना त्रिफळा बाद झाला,या धावा त्याने केवळ 16 चेंडूत काढल्या ज्यात चार खणखणीत चौकार होते.तो 14 व्या षटकात बाद झाला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 116 अशी होती.त्यानंतर विराट कोहलीने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत एक जबरदस्त खेळी करत भारतीय संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठून  दिली. दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने फारशी चांगली साथ मिळाली नाही.(Ind Vs Bangladesh) हार्दिक पंड्या(5),दिनेश कार्तिक (7) आणि अक्षर पटेल 7 धावा काढून स्वस्तात बाद झाले, पण विराटने याने जराही खचून न जाता जबरदस्त फलंदाजी केली.त्याने या वर्ल्डकप मधले तिसरे आणि टी-20 मधले एकूण 36वे अर्धंशतक पूर्ण करतानाच संघाला 184 ही चांगली धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.

विराटने केवळ 44 चेंडूत 8 चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारत नाबाद 64 धावा ठोकल्या. विराटची कामगिरी या वर्ल्डकपमधे अतिशय उत्तम होत आहे, ही भारतीय संघासाठी खूप चांगली बातमी आहे.त्याने आज अर्धशतक पूर्ण करताना आयसीसी वर्ल्डकप मधल्या सचिन तेंडुलकरच्या 21 अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरीही केली.विराटला अश्विननेही चांगली साथ देताना केवळ 6 चेंडूत 13 धावा चोपल्या.(IND vs Bangladesh) यामुळेच भारतीय संघाला आपल्या निर्धारित 20षटकात 6 बाद 184 धावा करण्यात यश आले,ज्या धावा विजयासाठी नक्कीच चांगल्या आहेत असा भारतीय भारतीय समर्थकांचा अंदाज होता.बांगलादेश संघाकडुन हसन मेहमूदने आपल्या कारकिर्दीतली सर्वोच्च कामगिरी करत तीन तर कर्णधार शकीबने 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

 

185 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सलामी जोडीने दडपणाखाली असुनही जोरदार सुरुवात केली. लिटन दास आणि शांतो यांनी केवळ 5 षटकातच नाबाद अर्धशतकी सलामी देत आम्ही सुद्धा येथे जिंकण्यासाठीच आलो आहोत असाच जणू संदेश दिला.(IND vs Bangladesh) लिटन दास तर जबरदस्त अंदाजात खेळत होता,त्याने मोहम्मद शमी,भुवनेश्वर ,अर्शदीप यांच्यावर जबरदस्त आक्रमण करत केवळ 21 चेंडूतच आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करुन संघाला जोरदार सुरुवात करुन दिली आणि रोहीतसारख्या धुरंधर कर्णधारावर सुद्धा दडपण आणले.पहिल्या पॉवरप्ले नंतर बांगलादेश संघाच्या बिनबाद 60 धावा होत्या,ज्यात लिटन दासच्याच 56 धावा होत्या ,त्याला आज नशिबानेही साथ दिली,कार्तिकने त्याला जीवदान दिले होते.तर एकदा त्याच्याविरुद्ध केलेले अपील डीआरएसच्या कौलात त्याला नाबाद ठरवून  गेले.

पॉवरप्लेनंतरच्या षटकात लगेचच पावसाने अडथळा आणला,ज्यामुळे काही मिनिटाचा खेळ वायाही गेला,त्यानंतर पावसाच्याच कृपेने खेळ पुन्हा सुरू झाला,ज्यानंतर बांगलादेशसाठी 54 चेंडूत 81 धावांचे लक्ष्य होते, अन त्यांचे दहाचे दहा गडी शाबुत होते.यावेळी सामना बऱ्यापैकी बांगलादेशच्या बाजूने झुकला होता मात्र याच दडपणाखाली भारतीय संघाने जबरदस्त वीजिगिशु वृत्तीचे झुंजार प्रदर्शन करत सामना आपल्या बाजूने झुकवून एक चित्तथरारक विजय मिळवून उपांत्यफेरीतले आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे.

 

पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाला आणि रवी अश्विनच्या पहिल्याच षटकात के एल राहुलने खतरनाक लिटन दासला अचूक फेकीव धावबाद केले अन बांगलादेशच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.या धक्क्यातून सावरण्याआधीच अनुभवी शमीने दुसरा सलामीवीर शांतोला बाद करुन भारतीय संघाला आणखी एक मोठे यश मिळवून दिले आणि युवा अर्शदीपने थोड्याच वेळात कर्णधार शकीब आणि हुसेनला एकाच षटकात बाद करुन सामना पूर्णपणे भारताच्या बाजूला झुकवला.यातच हार्दिक पंड्याने फलंदाजीतले अपयश भरून काढत यासीर अली आणि मोसद्दकहुसेनला बाद करुन भारताला विजयाच्या आणखीनच जवळ आणले.

आता विजय भारतीय संघाच्या फक्त काही इंचच दूर होता,पण जिद्दी बांगलादेशी खेळाडूही प्रयत्नाची शिकस्त करत होते, मात्र शेवटच्या दोन षटकात मोहम्मद शमी आणि युवा अर्शदीपने जबरदस्त गोलंदाजी  करत केली.19वे षटक हार्दीक पंड्याने तिखट टाकल्यानंतर अखेरच्या सहा चेंडूत बांगलादेश संघाला 20 धावा हव्या होत्या,त्यातच अर्शदीपच्या दुसऱ्या चेंडूवर हुसेनने गगनचुंबी षटकार मारत सामना सहजासहजी (IND vs Bangladesh) भारताला जिंकू देणार  नाही याचाच इशारा दिला, पण अर्शदीपने हिंमत न हारता जबरदस्त गोलंदाजी करत भारताला विजय प्राप्त करून दिला.बांगलादेश संघाचे प्रयत्न 5 धावांनी कमी पडले आणि भारतीय संघाने एकच जल्लोष करत विजयोत्सव सुरू केला. नाबाद अर्धशतक करुन भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठून देणारा विराट कोहली सामन्याचा मानकरी ठरला.

 

संक्षिप्त धावफलक
भारत 6 बाद 184
राहुल 50,सूर्यकुमार 30,कोहली नाबाद 64,अश्विन नाबाद 13
शकीब 33/2,हसन मेहमूद 47/3
विजयी विरुद्ध
बांगलादेश 6 बाद 145
लिटन दास 60,शांतो 21,नूरल हुसेन नाबाद 25
अर्शदीप 38/2,पंड्या 28/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.