Indian Railway : श्रमिक विशेष रेल्वेमधून 34 दिवसात 58 लाखाहून अधिक नागरिकांचा प्रवास

More than 58 lakh citizens traveled in 34 days by Labor Special Railway

सर्वाधिक प्रवासी उत्तर प्रदेशचे

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात देशभरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या कामगार, मजूर, पर्यटक, भाविकांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वेने श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या आहेत. या रेल्वे 1 मे 2020 पासून सुरु करण्यात आल्या आहेत. 1 मे ते 3 जून या 34 दिवसांच्या कालावधीत 58 लाखांहून अधिक प्रवाशांनी या विशेष श्रमिक रेल्वेने प्रवास केला आहे.

3 जून 2020 पर्यंत देशातल्या विविध राज्यांत एकूण 4 हजार 197 गाड्या चालवल्या गेल्या. श्रमिक स्पेशल गाड्यातून आत्तापर्यंत 58 लाखांपेक्षा जास्त प्रवासी 34 दिवसात आपापल्या राज्यात पोहोचले आहेत.

गुजरात हे देशात सर्वाधिक रेल्वे सुरु करणारे राज्य आहे. गुजरातमधून 3 जूनपर्यंत एक हजार 26 रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तर दुस-या क्रमांकावर महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रातून 3 जून पर्यंत 802 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या.

तिस-या क्रमांकावर असलेल्या पंजाबमधून 416, चौथ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशमधून 294 आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या बिहार राज्यातून 294 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक पोहोचल्या आहेत. देशभरातून उत्तर प्रदेश या राज्यात एक हजार 682, बिहार एक हजार 495, झारखंड 197, ओडिसा 187 आणि पश्चिम बंगालमध्ये 156 रेल्वे गाड्या पोहोचल्या आहेत.

प्रवाशांची नोंदणी करून तसेच विशेष काळजी घेऊन रेल्वे सोडण्यात येत असल्याने या रेल्वेमध्ये गर्दी होत नाही. श्रमिक विशेष गाड्यांबरोबरच, नवी दिल्लीला जोडणा-या आणि ये-जा करणा-या 15 विशेष राजधानी सारख्या गाड्या आणि 200 वेळापत्रकाप्रमाणे धावणा-या गाड्या देखील 1 जून 2020 पासून सुरू  झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.