Industrial Power : राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ, औद्योगिक ग्राहकांची संख्याही वाढली

एमपीसी न्यूज : राज्यातील औद्योगिक (Industrial Power) क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी 3833 दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती 4101 दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. तसेच, राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली.

ते म्हणाले की,2021-22 या आर्थिक वर्षात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण 39,397  दशलक्ष युनिट वीज वापरली होती, तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी 6,606 दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर 46003.26 दशलक्ष युनिट इतका होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीज वापर 3833 दशलक्ष युनिट होता. 2022-23 या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना 32808 दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी 4101 दशलक्ष युनिट इतका आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील नवीन औद्योगिक कनेक्शन (Industrial Power) घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक 14,885 होते. त्यांची संख्या या आर्थिक वर्षात वाढून नोव्हेंबरपर्यंत 15,078 झाली आहे. लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही 3,81,272 वरून वाढून 3,83,272 इतकी झाली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या 3,98,350 इतकी झाली आहे.

Pimpri News: नाशिक फाटा ते चाकणपर्यंत आता मेट्रोऐवजी मेट्रो निओ धावणार

राज्यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांना वीजदरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर 15 टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर वीजबिल भरले तर सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात. अशा सर्व सवलतींचा लाभ घेतला तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी 5 रुपये प्रति युनिट दराने वीज आकारणी केली जाते. या खेरीज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच डी आणि डी प्लस औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.