Pune – येरवड्यातील संदीप देवकर हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा तपास सुरु

गोळीबाराच्या घटनेने येरवडा परिसरात दहशत

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून रविवारी (दि. 6 ) संदीप सुभाष देवकर (49, रा. नवी खडकी, येरवडा) या इसमावर हल्ला करण्यात आला .  येरवडा महापालिकेच्या जुन्या क्षेत्रीय कार्यालय परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धारदार शस्त्राने आणि गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली . संदीप देवकर यांना जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले , परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉकटरांनी सांगितले . गोळीबाराच्या घटनेने येरवडा परिसर हादरून गेला आहे.

याप्रकरणी परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त आयपीएस प्रसाद अक्कांनवूर यांनी एमपीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार , मयत संदीप सुभाष देवकर हे सुरक्षा रक्षकाचे काम करत होते . तर मारेकरी येरवडा येथील नेताजी हायस्कूलसमोर वडापावची हातगाडी लावून व्यवसाय करत होते . वडापावची हातगाडी लावण्यावरून मारेकरी व देवकर यांच्यात दोन दिवसांपूर्वीच वाद झाला होता . ‘मी तुझा काटा काढतो’ …! अशा शब्दात मारेकरी यांनी देवकर यांना धमकावले होते . या भांडणाचा राग मनात धरून , संदीप देवकर हे जुन्या क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आले असता, दबा धरून बसलेल्या चार आरोपींनी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. या वेळी त्या ठिकाणी असणार्‍या सुरक्षारक्षकास देखील तलवार लावून धमकाविण्यात आले. एक जण बाहेर थांबला व तिघांनी मिळून देवकर यांच्यावर हल्ला केला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले . सुरुवातीला तलवारीने वार करण्यात आले , तर एकाने बंदुकीतून देवकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला , सुरक्षारक्षकाने माहिती दिल्यावर घटनेची माहिती सर्वत्र पसरली.

याप्रकरणी सचिन सुभाष देवकर यांनी फिर्याद दिली आहे. गणेश बोरकर याने त्याच्या साथीदारांना घेऊन संदीप यांचा खून केला असल्याचे संदीप दरेकर यांचे भाऊ सचिन दरेकर यांनी फिर्यादीमध्ये म्हंटले आहे . त्यानुसार येरवडा पोलीस पथकाने सूत्रे फिरवली आहेत .  सुरक्षारक्षक आणि इतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार आणि सीसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गणेश बोरकर यांच्या सह नक्की किती मारेकरी होते.  याचा तपास  केला जातो आहे .

घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथून बुलेटच्या पुंगळ्या मिळून आल्या आहेत .शवविच्छेदनाचा अहवाल आल्या नंतर त्यांना गोळ्या लागल्या कि नाही हे स्पष्ट होईल असे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कांनवूर यांनी सांगितले . अधिक तपास येरवडा पोलिस पथक करत आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.