IPL 2020 Qualifier 2: दिल्लीला फायनलचं तिकीट, रोमांचक सामन्यात हैदराबादवर 17 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – फायनलच्या तिकीटसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सन रायझर्स हैदराबाद मध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने हैदराबादवर 17 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 178 धावांत आटोपला. या विजयासह दिल्लीला आयपीएलच्या फायनलच तिकीट मिळालं आहे. तेराव्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात 10 नोव्हेंबरला रंगणार आहे. 

दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर त्रिफळाचीत झाला. प्रियम गर्ग (17) आणि मनीष पांडे (21) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले.

अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 11 धावांवर बाद झाला.युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. विल्यमसनने 45 चेंडूत 67 धावा केल्या तर समदने 33 धावा केल्या.

त्यानंतर कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. 20 षटकात हैदराबादने 178 धावांपर्यंत मारली. दिल्लीकडून रबाडाने 4, स्टाॅयनिस 3 तर अक्सर पटेलने एक गडी बाद केला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस यांनी ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत तुफान फटकेबाजी करत 65 धावा कुटल्या. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टॉयनीस 37 धावांवर त्रिफळाचीत झाला. शिखर धवनने फटकेबाजी सुरू करत 26 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं.

धवनसोबत चांगली भागीदारी करताना धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. त्याने 20 चेंडूत 21 धावा केल्या. शिखर धवनने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. 50 चेंडूत 78 धावा काढून तो माघारी परतला.

त्यानंतर शिमरॉन हेटमायरने 22 चेंडूत 42 धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. हैदराबाद कडून राशिद खान, संदिप शर्मा व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1-1-1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.